जळगाव मिरर | १६ फेब्रुवारी २०२५
राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज दि.१६ रोजी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे एका कार्यक्रमानिमित्त दौऱ्यावर असताना त्यांचे त्यांच्या पूर्वी दि.१५ रोजी रात्रीच्या सुमारास चोपडा तालुक्यातील महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या उमर्टी गावात एका पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण करण्यात आले. या घटनेनंतर पोलीस विभाग अलर्ट मोडवर असून या कर्मचाऱ्याच्या सुटकेसाठी जळगाव तसेच मध्य प्रदेशातील पोलीस कर्मचारी रवाना करण्यात आले होते. अखेर, चार तासांच्या थरारानंतर या पोलिस कर्मचाऱ्याला सुखरुप परत आणण्यास पोलिसांना यश आले आहे. या घटनेने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांचेच अपहरण होऊन त्यांना डांबून ठेवण्याचा प्रकार होत असेल तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. जणू गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या स्वागताची सलामीच ‘या’ आरोपींनी दिली आहे.
महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या चोपडा तालुक्याजवळ उमर्टी या गावात गेल्या अनेक वर्षापासून बेकायदेशीर पिस्तुलाची बनविण्यात येतात. नेहमीच जळगाव जिल्हा पोलीस दल मोठ्या कारवाई देखील करीत असता मात्र जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येण्यापूर्वीच या ठिकाणी चोपडा ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस कारवाईसाठी गेले असता. पोलीस कर्मचारयांवर हल्ला करीत एका कर्मचाऱ्यांचे अपहरण करून त्यांना दाबून ठेवले होते. त्यानंतर तत्काळ जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मोठा फौजफाटा तैनात करीत त्या पोलीस कर्मचाऱ्यांची सुटका केल्याने पोलीस अधीक्षकांचे कौतुक होत आहे. मात्र आज जर पोलीस कर्मचाऱ्यासोबत अशी घटना घडू शकते असेल तर सर्व सामान्य जनतेचे काय यावर गृहमंत्री देवेद्र फडणवीस कुठल्या कारवाईच्या सूचना देतील हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सीमेवरील प्रश्न सोडवणार कोण ?
महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या या गावात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पिस्तुल बनविण्याचे काम सुरु असल्याची नेहमीच चर्चा असते. यावर जळगाव जिल्हा पोलीस दल देखील कारवाई करतात मात्र सरकारने यावर जर दोन्ही राज्यांनी तोडगा काढल्यास याठिकाणी असलेले बेकायदेशीर काम बंद होणार. तर महाराष्ट्रात व मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असल्यावर देखील या सीमेलगत असलेल्या गावांचा व गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींवर कुठल्याही प्रकारे मोठी कारवाई होत नसल्याने हे भाजप सरकारचे अपयश आहे का असा प्रश्न देखील जळगाव जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जोरदार चर्चेत आला आहे.
समन्वय बैठकीचा अभाव !
तत्कालीन गृहमंत्री आर.आर. आबा पाटील असतांना राज्य समन्वय समितीची बैठक घेतली जात होती, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील पोलीस, महसूल व वन विभागाचे अधिकार उपस्थित राहत होते. आता या बैठकाच होत नसल्याने समन्वय होत नसल्याने अशा अप्रिय घटना घडत आहेत.