जळगाव मिरर | १५ डिसेंबर २०२५
सोशल मीडियावरील ओळखीचे प्रेमात रूपांतर होऊन पुण्यातील दोन अल्पवयीन मुली थेट राजस्थानात पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काळेपडळ पोलिसांनी तातडीची कारवाई करत तब्बल ३३०० किलोमीटरचा पाठलाग करून दोन्ही मुलींना सुखरूपपणे पुण्यात परत आणले. या प्रकरणी दोघा आरोपींना अटक करून त्यांच्यावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ व १६ वर्षांच्या या दोन्ही मुली परस्पर मैत्रिणी आहेत. त्यापैकी एका मुलीची इंस्टाग्रामद्वारे राजस्थानातील सुरेशकुमार वडदाराम प्रजापती (वय २१) याच्याशी ओळख झाली. महिनाभर संवाद झाल्यानंतर आरोपीने तिला प्रेमजाळ्यात अडकवत राजस्थानातील आपल्या गावात येण्याचे आमंत्रण दिले. ही बाब तिने मैत्रिणीला सांगितल्यानंतर तीही सोबत जाण्यास तयार झाली.
दि. २८ नोव्हेंबर रोजी दोन्ही मुली घरच्यांना कामावर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या. त्या आधी मुंबईत पोहोचल्या व तेथून राजस्थानकडे रवाना झाल्या. रात्रीपर्यंत मुली घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. अखेर दि. २९ नोव्हेंबर रोजी काळेपडळ पोलिस ठाण्यात बेपत्ता तक्रार दाखल करण्यात आली. मुली अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. गुन्हे शाखेचे युनिट-५ देखील तपासात सहभागी झाले. तांत्रिक तपासातून मोबाइल व सोशल मीडिया हालचालींचे विश्लेषण केल्यानंतर मुली राजस्थानात असल्याचे स्पष्ट झाले. सहायक पोलीस निरीक्षक अजय हंचाटे व पथकाने वापी, सुरत, अहमदाबाद, फालना, शिवगंज, राणी, पाली व जोधपूर या ठिकाणी शोध घेत तब्बल ३३०० किलोमीटरचा प्रवास केला.
राजस्थानातील राणी परिसरात एक मुलगी आरोपी सुरेशकुमार प्रजापतीसोबत आढळून आली. चौकशीत त्याने मुलीला राजस्थानात बोलावल्याची कबुली दिली. पुढील तपासात त्याचा मित्र सुरेशकुमार मोहनलाल राणीभील (वय ३१) याच्याशी दुसऱ्या मुलीची ओळख करून दिल्याचे व ते दोघे पाली येथे गेल्याचे उघड झाले. पोलिसांनी पाली येथे जाऊन दुसऱ्या आरोपीसह दुसऱ्या मुलीलाही ताब्यात घेतले.
राजस्थानात पोहोचल्यानंतर दोन्ही मुलींना आपल्या चुकीची जाणीव झाल्याचे पोलिसांनी सांगितले. काळेपडळ पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात पोक्सो कायद्याच्या कलम ४, ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.





















