
जळगाव मिरर | ६ एप्रिल २०२६
नाशिकमध्ये अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे शोषण आणि कोट्यवधींची माया जमवणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. स्वतःला ‘कॅप्टन’ किंवा ‘अवतारी पुरुष’ म्हणवून घेणाऱ्या अशोक खरातने अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचे शोषण आणि लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या अशोक खरात पोलीस कोठडीत आहे, आणि या प्रकरणावर विविध स्तरावरून प्रतिक्रिया समोर येत आहेत.
यातच प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांनी सोलापूरच्या खंडोबाची वाडी येथे आयोजित कार्यक्रमात भोंदूगिरीवर आपली प्रतिक्रिया दिली. कार्यक्रम श्री खंडोबा देव यात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आला होता. गौतमीच्या नृत्य कार्यक्रमात नागरिकांनी आणि महिलांनी मोठी गर्दी केली. तिने मंचावर एन्ट्री घेतल्यानंतर चाहत्यांनी जागेवर उभे राहून डान्स करत जल्लोष निर्माण केला.
गौतमी पाटील म्हणाली कि, “भोंदू बाबा अशोक खरातवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. योग्य ती कडक कारवाई झाली पाहिजे. याकडे जास्त गांभीर्यपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या देशात परत घडू नयेत. आताच यावर कडक कारवाई व्हायला हवी.”
या वक्तव्यामुळे प्रकरणातील सामाजिक गंभीरता पुन्हा एकदा समोर आली आहे. भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे नाशिकसह राज्यभरात अध्यात्माच्या नावाखाली होणाऱ्या शोषण आणि फसवणुकीवर चर्चा सुरू झाली असून, गौतमी पाटीलसारख्या प्रसिद्ध व्यक्तींच्या स्पष्ट वक्तव्यामुळे जनतेत जागरूकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






















