
जळगाव मिरर | ११ एप्रिल २०२६
थोर समाजसुधारक व क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय. एस. महाजन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करत त्यांच्या विचारांचा जागर केला.
भारतीय सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एका महान व्यक्तीच्या जन्मदिनापुरता मर्यादित नसून, समता, शिक्षण आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरुवात करणारा दिवस मानला जातो. महात्मा फुले यांच्या कार्यामुळे भारतीय समाजव्यवस्थेला नवी दिशा मिळाली, असे यावेळी वक्त्यांनी सांगितले.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी १८७० मध्ये पुण्यात पहिली सार्वजनिक शिवजयंती साजरी केली होती. तसेच १८६९ मध्ये त्यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढत शिवरायांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. समाजासाठी आयुष्य वेचणारे असे महात्मे नेहमीच अजरामर राहतात, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमास महानगर अध्यक्ष ईजाज मलिक, जिल्हा समन्वयक विकासदादा पवार, माजी महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक महानगर अध्यक्ष विनायक पाटील, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मजहर पठाण, जिल्हा ज्येष्ठ आघाडीचे अध्यक्ष एस. डी. पाटील, सरचिटणीस सुनील भैय्या माळी, प्रा. महाडिक, विद्यार्थी युवक जिल्हा अध्यक्ष गौरव वाणी, अकिल पटेल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस वाय. एस. महाजन यांनी केले.





















