जळगाव मिरर । २७ नोव्हेंबर २०२५
मध्यप्रदेशाील शेत मजूर शंकर राठीया मेहता (वय १७, रा. शिरवेल, अंबागाव, मध्यप्रदेश, ह. मु. विटनेर, ता. जळगाव) याचा विटनेर शिवारातील जंगलात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला, ही घटना बुधवार दि. २६ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकरगात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की , मध्यप्रदेशातील शिरवेल अंबागाव येथील शंकर मेहता हा तरुण आई वडीलांसह वर्षभरापूर्वी मजूरीसाठी जळगावात आला होता. विटनेर शिवारातील एका शेतात तिघ जण शेतमजूरी करीत होते. शंकर हा मानसिक दृष्ट्या आजारी असल्यामुळे तो अनेकदा घरातून कोणाला काहीही न सांगता निघून जात होता. परंतू पाच सहा दिवसानंतर तो पुन्हा घरी परतत देखील होता. परंतु गेल्या पंधरा ते वीस दिवसांपुर्वी शंकर हा विटनेर येथून निघून गेला होता. त्याच्या कुटुंबियांची त्याचा आठ ते दहा दिवस शोध घेतला. मात्र ती देखील तो मिळून आला नव्हता.
शंकरच्या कुटुंबियांनी शंकरचा फोटो तयार करून तो वेपत्ता झाला असून तो मिळाल्यास त्यांनी दिलेल्या मोवाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. मात्र तरी देखील शंकर हा मिळून येत नव्हता. विटनेर शिवारात असलेल्या जंगलाजवळ शेतात जाणाऱ्यांना दोन दिवसांपासून उग्र वास येत होता. त्यांनी ही बाब मजूरांच्या लक्षात आणून दिल्यानंतर मजूर हे जंगलात गेले यावेळी त्यांना तेथे नाल्याच्या काठावर असलेल्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेला मृत्तदेह मिळून आला. यावेळी मजूरांनी तो मृतदेह शंकरचा असल्याची ओळख पटवली.
शेतकऱ्याने घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी झाडाला कुजलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह खाली उतरवून तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बेपत्ता असलेला शंकर हा मानसिक दृष्ट्या आजारी असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. यापूर्वी देखील तो घरातून निघून गेला होता. परंतु आता थेट त्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आल्याने त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला. दरम्यान, पोलिसांकडून शंकरने आत्महत्या केली का त्याचा खून झाला याची चौकशी केली जात आहे





















