
जळगाव मिरर । २२ सप्टेंबर २०२५
पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक गावात शुक्रवार दि. १९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता हिवरा नदी के टीवेअर पुराच्या पाण्यात एक १५ वर्षीय मुलगी वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना घडली होती. त्या मुली सोबत असलेल्या तिच्या मामीला वाचविण्यात ग्रामस्थाना यश आले होते. या दुर्देवी घटनेची माहिती मुलीच्या चुलत आजोबांना कळताच हा धक्का सहन न झाल्याने तिच्या ६५ वर्षीय आजोबांचा देखील हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. नदी पात्रात वाहुन गेलेली मुलीचा मृतदेह तब्बल ४८ तासानंतर घटनास्थळावरुन सुमारे चार कि. मी. अंतरावरील परधाडे शिवारात दि.२१ सप्टेंबर रोजी सकाळी १०:४५ वाजता आढळून आला.
सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक गावात शुक्रवारी १९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास निकिता भालेराव (वय १५) आणि तिची मामी सरला विलास खरे (वय ३५) या दोघी हिवरा नदी पात्राच्या केटीवेअरमध्ये कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान निकीता हिचा पाय घसरून ती पाण्यात पडली. सदरचा प्रकार सरला खरे यांच्या लक्षात येताच त्यांनी निकीता हिस वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या अपयशी ठरल्या. सदरचा प्रकार माजी जि. प. सदस्य पदमसिंग पाटील यांचेसह गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
सरला खरे यांना मासेमारी करणारे प्रकाश पंडित भिल यांनी वाचविले. घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली असता निकिता हिचे चुलत आजोबा शामराव विठ्ठल खरे (वय ६५ वर्ष) यांना घटनेची माहिती कळताच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा देखील मृत्यू झाला होता. या घटनेनंतर निकीता हिचा शोध घेण्यासाठी गावातील माजी जि. प. सदस्य पदमसिंग पाटील यांचेसह महसूल विभाग, नगरपालिका प्रशासन परिसरातील ग्रामस्थ तळ ठोकून होते. घटनास्थळी आ. किशोर पाटील यांनी देखील भेट देवुन संबंधित विभागांना सुचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने माजी जि. प. सदस्य पदमसिंग पाटील व ग्रामस्थांनी युद्ध पातळीवर शोध मोहिम सुरु ठेवली असता दि. २१ सप्टेंबर रोजु घटनास्थळा पासून ४ कि. मी. अंतरावर निकीता हिचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. तिचे शव पाचोरा ग्रामिण रूग्णालयात आणल्यानंतर शोकाकुल वातावरणात तीच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या दुर्देवी घटनेमुळे उत्राणसह वडगाव टेक गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.




















