जळगाव मिरर | ४ जानेवारी २०२५
जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग येऊ लागला असून अनेक प्रभागांमध्ये प्रचाराचा नारळ फुटण्यास सुरुवात झाली आहे. महायुतीनेही आपला अधिकृत प्रचार जोमात सुरू होणार असून तरी या निवडणुकीत उमेदवारी वाटपामुळे नाराज झालेल्या निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नाराजी अद्याप कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या निवडणुकीत अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून आयात उमेदवारांना संधी दिल्याने महायुतीतील अंतर्गत अस्वस्थता उफाळून आली आहे. परिणामी, काही प्रभागांमध्ये प्रचाराची सूत्रे हातात घेण्याऐवजी कार्यकर्ते सावध भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना प्रचार सुरू करण्यापूर्वीच पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याची वेळ येत आहे.
काही ठिकाणी उमेदवारांना घरोघरी प्रचारापेक्षा आधी बैठका घेऊन नाराज कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावे लागत आहे. “पक्षासाठी काम करा, विजयासाठी एकत्र या,” असे आवाहन करण्यावर अधिक भर दिला जात असून, प्रचारापेक्षा अंतर्गत समन्वय राखण्याचे मोठे आव्हान महायुतीसमोर उभे राहिले आहे.
दरम्यान, विरोधकांकडून या नाराजीचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू असून, प्रत्येक प्रभागात परिस्थिती वेगळी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महायुतीतील नाराजी कितपत दूर होते आणि कार्यकर्ते किती सक्रिय होतात, यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.





















