जळगाव मिरर | ५ नोव्हेंबर २०२५
एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली गावात मंगळवारी झालेल्या गोळीबारातील जखमी सोनू सुभाष बडगुजर (रा. कढोली) याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्याच्यावर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, शस्त्रक्रियेद्वारे छातीत अडकलेली गोळी यशस्वीरीत्या काढण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी जितू ईश्वर कोळी (वय २२, रा. कढोली) याच्याविरुद्ध एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंतीलगत असलेल्या टपऱ्यांच्या मागे काही युवक हुल्लडबाजी करीत असताना, जितूकडून अचानक गोळी सुटली. ती थेट सोनू बडगुजरच्या छातीत जाऊन लागली. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली होती. गावातील मराठी शाळा परिसर हा रात्रीच्या वेळी दारू पिणाऱ्यांचा अड्डा बनल्याची चर्चा आहे. गोळीबारानंतर दोन दिवसांपासून मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन गावात येऊन तपास सुरू असून, पोलिस सर्व बाजूंनी चौकशी करीत आहेत.
काही दिवसांपूर्वी खेडी खुर्द येथे दुर्गादेवी विसर्जनावेळी दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीतही शस्त्रांचा वापर झाल्याची घटना घडली होती. आता पुन्हा गोळीबार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.



















