जळगाव मिरर । २८ जानेवारी २०२३ ।
चाळीसगाव ते नांदगाव रस्त्यावरील खडकी बुद्रुक गावाजवळ नांदगावकडून चाळीसगावकडे जाणाऱ्या बाेलेराे (एमएच- १५, सीके- ५७४०) या वाहनातून गोवंश जातीची जनावरे निर्दयीपणे बांधून वाहतूक हाेत असल्याची माहिती मिळताच जमावाने हे वाहन अडत वाहनातील गायींची सुटका केली. त्यानंतर हे वाहन पेटवून दिले. दरम्यान, वाहनात कोंबलेल्या १२ गायींपैकी एका गायीचा मृत्यु झाल्याचे आढळून आले. याप्रकरणी गोवंशाची वाहतूक करणाऱ्या अनोळखी व्यक्तींविरोधात चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या गायींची बेलदारवाडीच्या गोशाळेत रवानगी केली आहे. गुरुवारी रात्री झालेल्या या घटनेमुळे घटनास्थळी काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
या वाहनात क्रूरपणे कोंबलेल्या गायी हाेत्या. जमावाने या वाहनातील गायींची सुटका करून हे वाहन उलटवून पेटवून दिले. या वेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. गर्दी व अंधाराचा फायदा घेऊन बोलेरो वाहनाचा चालक पळून गेला. पोलिसांनी जळीत बोलेरो वाहनासह १२ गायी ताब्यात घेतल्या अाहेत. त्यापैकी एका गायीचा मृत्यू झाल्याचे समोर आले. ही गुरे तसेच त्यातील मृत गाय बेलदारवाडी येथील गणपूर गोशाळेत रवाना करण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोलिस नाईक अमित बाविस्कर, भटू पाटील, मुकेश पाटील, भूषण पाटील, राहूल सोनवणे, कॉन्स्टेबल उज्ज्वला म्हस्के यांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर बोलेरो जळत असताना त्यांना दिसली. या ठिकाणी वाहनातून उतरवलेली गुरे हाेती. पोलिसांनी तत्काळ अग्निशमन बंबाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली. या प्रकरणी पोलिस नाईक राहूल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यता चालकासह अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.