जळगाव मिरर | २७ जून २०२४
भडगाव तालुक्यातील खेडगाव येथील सुरेश नामदेव मोरे (वय ३२) या तरुणाचा पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने २६ रोजी मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. सुरेशच्या मृत्यूने त्याचे कुटुंब निराधार झाल्याने शासकीय मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्त असे कि, दोन महिन्यांपूर्वी कोळगाव वीज उपकेंद्राच्या रस्त्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने १५ ते २० जणांना चावा घेतला होता. सुरेश मोरे देखील त्या दिवशी विहिरीच्या कामावरून दुचाकीने घरी परत येत असताना या पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्या पायाच्या टाचेला चावा घेतला होता. निकटवर्तीयानुसार त्याने गुढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यावरील इंजेक्शन घेतले होते. मात्र, मागील दोन दिवसांपासून तो अस्वस्थ होता. हवा, पाण्याला घाबरणे आदी रेबीज रोगाची लक्षणे होती. त्यास २५ रोजी धुळे येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यास रेबीजची लक्षणे तीव्र होत त्रास अधिकच जाणवू लागला. यानंतर त्याला नातेवाइकांनी घरी परत आणत असताना त्याचा मृत्यू झाला.