जळगाव मिरर | ४ जानेवारी २०२५
मालेगाव-मनमाड महामार्गावरील कुंदलगाव शिवारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक मालवाहू ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे ४० ते ५० फूट खोल विहिरीत पडल्याची घटना घडली. या घटनेत ट्रकचालकासह क्लीनरही बेपत्ता झाला असून, मालेगाव येथील बचाव पथकाने दिवसभर तीन क्रेन, जेसीबीच्या मदतीने दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु सायंकाळी उशिरापर्यंत दोघांपैकी कोणीही हाताशी न लागल्याने दोघेही वाहनातच अडकून पडल्याची भीती व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगावकडून येणाऱ्या मालवाहू ट्रक (क्र. टीएन ८८ पी १५६०) ला पहाटेच्या सुमारास कुंदलगाव शिवारात चौधरी मळ्यातील विहिरीत अपघात झाला. विहिरीचे मालक विजेचा पंप सुरू करण्यासाठी आले असताना त्यांना विहिरीत ट्रक दिसला. त्यांनी या घटनेची माहिती ग्रामस्थ व पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर तत्काळ बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने दिवसभर तीन क्रेन, जेसीबीच्या मदतीने दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु सायंकाळी उशिरापर्यंत ट्रक अथवा चालक व क्लीनर यांच्यापैकी कोणालाही बाहेर काढण्यात यश आले नसल्याने त्यांना वाचविण्यासाठी बचाव पथकाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत पोलीस निरीक्षक कैलास वाघ, पोलीस हवालदार बी. व्ही. सांगळे आदी तपास करीत आहेत.