जळगाव मिरर | १८ फेब्रुवारी २०२५
मुलाला शासकीय नोकरी लावण्याचे आमीष दाखवत शेतकऱ्याची तब्बल ५ लाख ५० हजार रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर रविवारी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील ममुराबाद प्रभाकर सोपान जावळे (वय ५५) हे शेती व्यवसाय करुन आपला आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्यासोबत पत्नी व मुलगा असा परिवार आहे. प्रभाकर जावळे यांचा मुलगा कुणाल याला शासकीय नोकरी लावून देण्याचे आमीष देत, २०१८ पासून ते आतापर्यंत सतीष दिलीप चौधरी (वय ३२, व्यवसाय व्यापारी) शशिकांत दिलीप चौधरी (वय २९), धर्मराज रमेश खैरणार (वय ३५), सरिता पंढरीनाथ कोळी (वय ४५, गृहिणी, रा. चहार्डी, ता. चोपडा) व पंढरीनाथ भागवत कोळी (वय ५०, रा. चहार्डी, ता. चोपडा) यांनी ऑनलाईन व रोख पध्दतीने ५ लाख ५० हजार रुपयांची रक्कम घेतली.
मात्र, मुलाला नोकरी लावून दिली नाही. संबधितांकडून पैसे परत मागितल्यावर देखील पैसे दिले जात नसल्याने, प्रभाकर जावळे यांनी न्यायालयात धाव घेतली. जळगाव न्यायालयाने १३ फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशानंतर संबधित पाच जणांविरुध्द जळगाव तालुका पोलिस ठाण्यात रविवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनील पाटील हे करत आहेत.