जळगाव मिरर | ३१ जानेवारी २०२४
जळगाव शहरातील एका परिसरात जून्या वादातून १० वर्षीय चिमुकलीसह तिच्या वडीलांवर चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना मंगळवार दि. ३० जानेवारी रोजी दुपारी सुप्रिम कॉलनी परिसरात घडली. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता, हल्लेखोर त्याठिकाणी देखील शस्त्रे घेवून आले होते. परंतु जखमींच्या नातेवाईकांना बघताच त्यांनी तेथून पळ काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुप्रिम कॉलनीतील मच्छी मार्केट येथे कैलास उखा पवार (वय ३२) हे आपल्या पत्नी व मुलांसह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी ३० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याच परिसरात राहणाऱ्या चार ते पाच हल्लेखोरांनी कैलास पवार यांच्या घरात घुसून त्यांच्यावर चॉपर हल्ला केला. यावेळी कैलास पवार यांची मुलगी तेजस्वीनी कैलास पवार (वय-१०) ही देखील घरात असतांना तिच्या हातावर देखील चॉपर हल्ला करून जखमी केले. या हल्ल्यात कैलास पवार आणि तेजस्विनी पवार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले.
जखमी बाप लेकीला शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यासाठी आणले असता, याठिकाणी देखील दोन हल्लेखोर हातात धारदार शस्त्र घेवून आले होते. याठिकाणी त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मात्र जखमींच्या नातेवाईकांनी त्यांना विरोध केला असता, ते हल्लेखोर तेथून पसार झाले. या घटनेमुळे जखमींचे नातेवाईक प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होते.