
रावेर ः प्रतिनिधी
तालुक्यातील निंभोरा बु. येथील वार्ड क्र.6 मधील परिसरात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरल्याने या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी जणू ग्रामपंचायत खेळत आहे का असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, निंभोरा बु.येथील वार्ड क्रं.6 मधील निंभोरा पोलिस स्टेशन परिसरात गावातील वार्डातील लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या ही वार्ड क्रं.6 मध्ये आहे. तरीसुध्दा ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजन या वार्डात पहायला मिळतो. गटारी तुडूंब भरुन वाहत आहे त्याचबरोबर वार्डामध्ये लहान मुले, वृध्द नागरिक आहे. त्यांच्यासह नागरिकांच्या आरोग्याशी ग्रामपंचायतीने खेळ मांडला असल्याचे चित्र या ठिकाणी पहायला मिळते. दर शनिवारी पसिरातील कचरा उचलण्याचा व गटारी साफ करण्याचा दिवस नेमूण दिला आहे. तरीसुध्दा याठिकाणी एक महिन्यापासून ग्रामपंचायतीचे कुठलेही कर्मचारी साफसफाईसाठी येत नाही. ज्याठिकाणी ग्रामपंचायतीचे सदस्य राहतात त्याठिकाणी मात्र स्वच्छता असते. मात्र ज्याठिकाणी त्या सदस्यांना निवडून आणणारे जनता राहते तेथे मात्र घाणीचे साम्राज्य हेच या गावात पहायला नेहमी मिळते.
विशेष म्हणजे या परिसराला लागून जि.प.मराठी मुलांची शाळा व अंगणवाडी आहे. या शाळांच्या आवारातही कचरा व गवताची वाढ झालेली आहे व ओपनस्पेसमध्येही गवत वाढले असुन जमिनीचे रूपांतर दलदलीच्या भागामध्ये झाले आहे. गेल्या एक वर्षात या परिसरातील पावसाच्या पाण्याचे डबकेही मुरुम टाकून बुजल्या गेले नाही. या सर्व प्रकार पासुन
लोकप्रतिनिधी , सरपंच , ग्रामविकास अधिकारी परिचित आहेत. तरीही ग्राम-प्रशासन काम करीत नसुन फक्त हो चे पाणी पाजण्यात व्यस्त आहे. अश्या ग्रामप्रशासनाचा फायदा तरी काय? या परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावणे, तणनाशक फवारणी करणे , डबके बुजणे. ही सर्व कामे त्वरीत करावी. शाळेतील लहान विद्यार्थ्यांच्या व रहिवासीयांच्या आरोग्याशी चालू असलेला खेळ त्वरित बंद करून नियोजित कामे करावी. अशी मागणी येथील अक्षय तायडे, मकबूल पटेल, भगवान सपकाळे यांच्यासह सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.





















