भुसावळ : प्रतिनिधी
गुरूचे जीवनातील स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शिष्याच्या दुर्गुणांना दूर करून गुरू त्याच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करतात. ज्या व्यक्तीला एका चांगल्या गुरूचा सहवास लाभला नाही, त्याचे जीवन अंधकारमय असते. गुरू आपणास जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. गुरूरूपी शिक्षक आपल्या शिक्षणाच्या मदतीने व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो. अशा शिक्षकांचा सन्मान करण्याचे भाग्य देशमुख परिवाराला लाभले असल्याचे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण डायट संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी केले.
भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयातील वाचन कक्षात 5 सप्टेंबर शिक्षकदिनाचे औचित्य साधून शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे तर प्रमुख पाहुणे म्हणून डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे, माजी प्राचार्य डॉ. जगदीशप्रसाद सूचिक डॉ. चंद्रकांत साळुंखे, माजी नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर, प्रा. शैलेश पाटील, पत्रकार संजयसिंग चव्हाण तसेच आयोजक डॉ. छाया फालक देशमुख, रूपेश देशमुख उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ. छाया फालक देशमुख यांनी सोहळा सन्मानाचा गौरव शिक्षकांचा गुरूगौरव सन्मान सोहळा आयोजनाची भूमिका मांडली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती मातेच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. मनीषा देशमुख यांनी स्वागत गीत म्हटले. महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर यांनी शिक्षकांमुळेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो व आयुष्यात काहीतरी मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याला प्रेरणा मिळते, असे सांगितले. प्रा. शैलेश पाटील म्हणाले की, मुलांची क्षमता वाढवण्याच्या व एखाद्या विषयात मुलाची आवड निर्माण करण्याच्या प्रक्रियेत शिक्षक मोठी भूमिका बजावतात. डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांनी विद्यार्जन करणारे विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे संबंध जिव्हाळ्याचे असायला हवेत. तसेच मजबूत समाज घडविण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा मिळून भक्कम सेतू बांधण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. माजी प्राचार्य डॉ. जगदीशप्रसाद सूचिक म्हणाले की, जो रात्रंदिवस ज्ञान मिळविण्यासाठी धडपडतो आणि विद्यार्थ्यांना ज्ञान देतो, तोच तळमळीने कार्य करणारा खरा शिक्षक असतो. डायट अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे यांनी आपल्या वाट्याला आलेले कार्य कुशलतेने, आनंदीवृत्तीने, बिनचूकपणे, वेळेत, नियमांच्या अधीन राहून करायला हवे, असे सांगितले. यानंतर शिक्षकांचा गुरूगौरव सन्मान करण्यात आला. नियोजनात सहकार्य करणाऱ्या डॉ. जगदीश पाटील, डी. के. पाटील, संजीव पाटील, मयूर अंजाळेकर, प्रदीप (लखन) देशमुख व कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डी. के. पाटील यांनी तर आभार मनीषा देशमुख यांनी मानले.
120 शिक्षकांचा गुरूगौरव सन्मान –
भुसावळ येथील वार्ड क्रमांक 24 मधील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विभागात कार्यरत 120 शिक्षकांचा गुरूगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन शिक्षकांना गौरविण्यात आले. शिक्षकदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सन्मानाने शिक्षक भारावून गेले.