जळगाव मिरर | ३ जुलै २०२५
कंपनीतून उत्पादीत होणारा मालाची जिल्ह्यात विक्री करण्यासाठी मद्य वितरक परवाना देण्याचे अमिष दाखवून शिवाजी सीताराम पाटील (वय ६३, रा. दादावाडी मागे) यांची दोन जणांनी ९ लाख रुपयांमध्ये फसवणूक केली. हा प्रकार नोव्हेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान घडला. या प्रकरणी दीपक लोटन खैरनार (वय ६०, रा. महावीर नगर), नितीन गुणवंतराव सोनवणे (वय ६४, रा. गणेशवाडी) या दोघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील दादावाडी परिसरामागे शिवाजी पाटील हे वास्तव्यास असून ते शेतकरी आहे. ते राजकीय क्षेत्रात देखील काम करीत असल्याने त्यांची ओळख दीपक लोटन खैरनार यांच्यासोबत झाली होती. त्यांच्यात संपर्क वाढल्याने व्यावसायीक संबंध निर्माण झाले होते. दरम्यान, दीपक खैरनार व नितीन सोनवणे या दोघांनी कट रचून आपण बॅरल अँड कास्क कंपनीचे स्टेट पार्टनर व मार्केट हेड असल्याची बतावणी करून शिवाजी पाटील यांना सांगितले. तसेच कंपनीमधून उत्पादीत होणाऱ्या मद्याचा माल जळगाव जिल्ह्यात विक्री करण्यासाठी परवाना काढून देण्याचे अमिष दाखविले. यासाठी त्यांनी पाटील यांच्याकडून नोव्हेंबर २०२२ पासून फेब्रुवारी २०२५पर्यंत वेळोवेळी एकूण ९ लाख रुपये घेतले.
वेळोवेळी पैसे देऊन अनेक दिवस झाले तरी परवाना मिळत नव्हता. त्यामुळे शिवाजी पाटील यांनी दीपक खैरनार यांच्याकडे परवानाबाबत पाठपुरावा केला. मात्र दोघांनी परवाना तर दिलाच नाही व दिलेली रक्कमही परत केली नाही. त्यामुळे शिवाजी पाटील यांनी आपली फसवणुक झाल्याची खात्री झाली. त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दीपक खैरनार, नितीन सोनवणे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अधिक तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
