
जळगाव मिरर | २८ नोव्हेबर २०२३
जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयात कंट्रोल रूमला कर्तव्यावर हजर असलेले गोविंद प्रेमचंद मोरे (वय ५०, मूळ रा. धुळे, ह. मु. भुसावळ) हे चक्कर येवून पडल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पोलीस मुख्यालयात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील देना नगरातील रहिवाशी असलेले गोविंद प्रेमचंद मोरे हे पोलीस हेड कॉन्सटेबल आपल्या पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला असून ते जळगावातील पोलीस मुख्यालयातील कंट्रोल रूममध्ये सकाळी सात वाजेच्या सुमारास हजर झाले. यावेळी त्यांना अचानक चक्कर आल्याने ते खाली कोसळले आणि बेशुद्ध पडले. ही घटना त्यांच्यासोबत ड्युटी करणाऱ्या सहकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच पोलीस वाहनातून मोरे यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.
याठिकाणी वैद्यकीय अधिकारी सीएमओ डॉ. निरंजन पाटील देशमुख यांनी त्यांची तपासणी करीत मयत घोषीत केले.
रुग्णालयात कुटुंबियांचा आक्रोश घटनेची माहिती मिळताच मोरे यांच्या कुटुंबियांसह नातेवाईक व सहकाऱ्यांनी जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात धाव घेतली. याठिकाणी मोरे यांच्या कुटुंबियांनी मनहेलावणारा आक्रोश केला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास पोहेकॉ महेंद्र पाटील हे करीत आहे.