अकोला : वृत्तसंस्था
मुलींच्या वसतिगृहात मुलांना कधीच प्रवेश मिळत नाही हे आपण नेहमी ऐकत असतो व तिथे सुरक्षारक्षक सुद्धा असतात. पण या मुलाने चक्क मुलीच्या वसतिगृहात प्रवेश केला. या युवकाने मुलीचा वेषांतर करून मुलींच्या वसतिगृहात प्रवेश केल्याची धक्कादायक घटना अकोला येथे घडली आहे.
काय आहे प्रकार ?
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात एक मुलगा वेषांतर करुन शिरला. ही घटना मागील आठ दिवसापूर्वी घडली होती. परंतु, कृषी विद्यापीठ प्रशासनाने यावर अद्याप कोणतीही कारवाई केली नसून या प्रकरणात चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. या गंभीर घटनेबाबत अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेकडून आंदोलन करून विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांकडून घटनेचा व प्रशासनाच्या चुप्पीचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.
विद्यार्थिनींच्या सुरक्षेत निष्काळजी होत असल्याचं या घटनेच्या माध्यामातून समोर आलं आहे. वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षे संदर्भात अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत. संबधित प्रकार हा गंभीर असून तो लक्षात आणून देण्याकरिता विद्यार्थी परिषदने आज मंगळवारी विद्यापीठात आंदोलन केले. यावेळी कुलगुरूंनी निवेदन स्वीकारण्यात विलंब केल्याची तक्रारही अभाविपकडून करण्यात आली आहे. यामुळे आंदोलनकर्त्यांनी विद्यापीठांतील कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न केला.
दोषींवर कारवाई कडक कारवाईची मागणी
या प्रकरणात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. विद्यार्थिनी वसतिगृहाच्या रेक्टर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यापीठाची सुरक्षा वाढविण्यात यावी, तसेच भविष्यात असा निष्काळजीपणा होणार नाही याची काळजी घेण्याचे निवदनात नमूद आहे.
