जळगाव मिरर | २३ डिसेंबर २०२४
मित्राचा वाढदिवस साजरा करुन परतणाऱ्या तरुणांची भरधाव कार झाडावर आदळून भीषण अपघात होवून तीन तरुण जागीच ठार झाले होते. तर अन्य तिघे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयता उपचार सुरु आहे. गंभीर जखमी झालेल्या गणेश संतोष भोई (वय २८, रा. रावेर) या तरुणाचा रविवारी दुपारच्या सुमारास उपचार सुरु असतांना दुर्देवी मृत्यू झाला. त्यामुळे कार अपघातातील मृतांची संख्या चार झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मित्राचा वाढदिवस साजरा करुन सहा मित्र कारमधुन भुसावळहून रावेरकडे जात होते. गुरुवारी मध्यरात्रीनंतर पिंपरुड-सावदा मार्गावर भरधाव कारने एका झाडाला जोराने धडक दिली. या भीषण अपघातामध्ये शुभम सोनार, मुकेश रायपूरकर व जयेश भोई या हे तिघ जागीच ठार झाले होते. तर विजय जाधव, अक्षय उन्हाळे व गणेश भोई हे गंभीर जखमी झाले होते. या तिघांना जळगावातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. गणेश भोई याच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. रविवार दि. २२ रोजी दुपारी त्याची प्रकृती खालावत्यामुळे उपचार सुरु असतांना त्याची प्राणज्योत मालवली.
अपघातातील चौथा गंभीर जखमी गणेश भोई याचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, त्याच्या कुटुंबियांना मानसिक धक्का बसला आहे. गणेशच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व दोन भाऊ असा परिवार आहे. अपघातात ठार झालेल गणेश यांना एक वर्षाचा मुलगा असल्याने त्याचे पितृछत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.