
जळगाव मिरर | २७ नोव्हेबर २०२३
वुशू खेळाचे बोगस प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी – मदत करून शासनाची दिशाभूल करता, – तुमची शासनाकडे तक्रार करून बदनामी करू, अशी धमकी देत क्रीडा प्रशिक्षकाला ब्लॅकमेल करत दोन शिष्यांनीच अडीच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला.
मिळालेल्या माहितीनुसार, क्रीडा शिक्षक महेश कृष्णा इंदापुरे (रा. ईटखेडा) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, अर्जुन उत्तम पवार आणि योगेश नामदेव जाधव या दोन्ही आरोपींनी त्यांच्याकडे वुशू खेळाचे चार ते सहा महिने प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांची जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. यादरम्यान पवार याने महेश यांचा पेनड्राइव्ह चोरून नेला होता. ऑगस्ट महिन्यात दोन्ही आरोपींनी महेश यांच्या व्हॉट्सअॅपवर कॉल करून तुमचे सर्व धंदे माहिती आहेत, तत्काळ अडीच लाख रुपये द्या अन्यथा तक्रार करून तुम्हाला बदनाम करेन, अशी धमकी दिली. २१ नोव्हेंबर रोजी पवारने महेश यांना नक्षत्रवाडी येथील एका हॉटेलमध्ये बोलावले. महेश हे त्यांचे मित्र सुमित खरात यांना सोबत घेऊन गेले. तेव्हाही योगेशने अर्जुनला अडीच लाख रुपये देऊन टाका आणि हा विषय येथेच संपवा, असे सांगितले.