जळगाव मिरर | २३ जुलै २०२५
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महायुती सरकारमधील काही मंत्री अडचणीत असतांना आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सावली बारची पाहणी करत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला. डान्सबार चालवणारे गृहमंत्री महाराष्ट्राला नको, अशा शब्दात त्यांनी कदम यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे. गृह राज्यमंत्री यांच्या आईच्या नावाने बारचा परवाना असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
सावली बार प्रकरणांमध्ये आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सावली बार मध्ये जाऊन बारची पाहणी केली. कारवाई झाल्यानंतर हा बार बंद करण्यात आला आहे. या बारमध्ये काही चुकीचे होत नव्हते तर बार बंद ठेवण्याची वेळ का आली? असा प्रति प्रश्न दमानिया यांनी विचारला आहे. या संदर्भात आपण सर्व कागदपत्रांची पाहणी केल्यानंतरच बोलणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
आज या बार आणि परिसराची पाहणी केली असता या ठिकाणी डान्सबार होता, असेच दिसून आले आहे. या संदर्भात आपण या एफआआयची पूर्ण कॉपी वाचलेली आहे. म्हणूनच आपण पोलिस अधिकाऱ्यांची देखील भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
योगेश कदम यांना याआधी देखील बीड मधील डान्सबार प्रकरणाचे व्हिडिओ पाठवत त्यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली होती. मात्र त्यांनी संबंधित डान्सबार वर कोणतीच कारवाई केली नव्हती. त्यानंतर मी ते व्हिडिओ मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या बीडमधील डान्सबारवर कारवाई झाली होती. मात्र योगेश कदम यांनी कारवाई का केली नाही? याचा उलगडा मला आज झाला असल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले आहे.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील हा मुद्दा गाजला होता. अनिल परब यांनी विधानपरिषदेत उपरोक्त आरोप केला होता. अनिल परब अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना म्हणाले की, मुंबईच्या कांदिवाली भागात सावली बार आहे. तिथे पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी 22 बारबाला पकडल्या गेल्या. या कारवाईत 22 बारबालांसह 22 कस्टमर व 4 कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा दाखल करून आढळलेल्या ग्राहकांवर गुन्हा दाखल केला. गंभीर गोष्ट म्हणजे या बारचे परमिट ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. या महिला गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री आहेत. राज्यात डान्सबारवर बंदी असताना हा बार सुरू कसा? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.
