जळगाव मिरर | १३ जुलै २०२५
रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव येथे विद्यार्थ्यांचा शपथविधी समारंभ अत्यंत थाटात आणि प्रेरणादायी वातावरणात लता मंगेशकर हॉल येथे पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी जबाबदाऱ्या स्वीकारून प्रामाणिकपणे कार्य करण्याची शपथ घेतली.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेला वंदन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. फ्लोरीडा वरून व्हाट्सअप कॉल द्वारे शाळेच्या संस्थापिका अध्यक्ष महोदया सौ. रोजमीन खिमानी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शाळा म्हणजे केवळ ज्ञानदानाचे केंद्र नाही, तर ती देशाचा उत्तम नागरिक घडवण्याचे पहिले पाऊल आहे.”
शपथविधीसारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, जबाबदारी आणि कर्तव्यनिष्ठा या मूल्यांची पेरणी होते. विद्यार्थी नियमांचे पालन करतात, आपली कामगिरी प्रामाणिकपणे बजावतात, हे विशेष उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी एक छोटीशी नाटिका व नृत्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. या सादरीकरणातून त्यांनी नेतृत्व, जबाबदारी व शिस्त या मूल्यांचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.
या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विष्णू भंगाळे सर (नगरसेवक जळगाव महानगरपालिका) व श्री. दर्शन जैन सर (चार्टर्ड अकाउंटंट) उपस्थित होते. सौ.अबोली पीयुष पाटील.( शाळा मार्गदर्शक) प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या बालकलाकारांनी स्वहस्ते तयार केलेल्या आकर्षक ग्रीटिंग कार्ड आणि स्मृतिचिन्ह (मोमेंटो) देऊन अत्यंत सादरभावाने करण्यात आले.
पाहुण्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन, शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण यांची शिकवण दिली. शाळेचे हेड बॉय – यज्ञेश पाटील व हेड गर्ल – आफ्रिना खातून, तसेच विविध हाऊस कॅप्टन्स, क्रीडा व शिस्त प्रमुख यांनी आपल्या पदांची शपथ घेतली. विद्यार्थ्यांना पदग्रहण बॅज प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. दहावी वर्गाच्या तेहसीन बागवान, रेहान शेख, सायमीन शेख व मुदसिर या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचा समारोप शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सीता तिवारी मॅडम यांनी पाहुण्यांचे आभार व्यक्त केले.. हा शपथविधी समारंभ विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक प्रेरणादायी, सर्जनशील आणि संस्मरणीय अनुभव ठरला
