विशेष लेख | सागर दिलीप कुटुंबळे | ९१५८३२३४९०
महानगर पालिकेच्या निवडणुकीचा धुराळा उडायला सुरुवात झाली आहे. प्रभागाचे पुढील पाच वर्षे हि आता कोणाकडे सोपवायची याचे उत्तर देण्याची वेळ आता प्रभागातील मतदारांच्या हाती आली आहे. मतदार म्हणजे रहिवाशी, आपले सोबती, आपल्याच सारखे नागरिक हे ज्या उमेदवाराला कळेल तोच प्रभागाचा नगरसेवक होण्यास योग्य राहिल हे कळवण्याची वेळ या होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आली आहे. मतदानाच्या निमित्ताने मतदारांशी उमेदवाराचे एक नाते निर्माण होत असते, त्याच नात्याला तो पाच वर्षे बांधिल असतो, वचनपुर्तीसाठी तो कटिबध्द असतो. आपल्या प्रभागाचा नगरसेवक हा प्रभागामधील ज्येष्ठ, अनुभवी, सुशिक्षित आणि साधारणपणे नागरिकांशी सुख-दु:खाशी एकरूप आणि समरस होणारा लोकप्रतिनिधी निवडण्यावर आपला कल हवा, तरच त्या नगरसेवकाला ठराविक मर्यादेमध्ये समाजकारण आणि राजकारणात विशेष असे महत्वही प्राप्त होते.
नगरसेवक या पदाला पूर्वीपासून मान आहे, प्रतिष्ठा आहे आणि या मेहेरबान अशा आदरार्थी नावाने नगरसेवकांना सन्मानपूर्वक बोलावलेही जात असते परंतु “नगरसेवक’ या पदाची प्रतिष्ठा जपण्यासाठी त्या उमेदवाराने तितके कष्टही घेतले पाहिजे, अन्यथा नगरसेवक हा शब्द वाईट अर्थाने म्हटला जातोय की काय? असे राजकीय वातावरण प्रभागात तयार व्हायला वेळ लागत नाही.
ज्या लोकांचे, नागरिकांचे, प्रभागातील रहिवाशांचे आपण लोकप्रतिनिधीत्व करतो, त्या लोकप्रतिनिधीची म्हणजेच नगरसेवकांची नेमकी कर्तव्ये काय आणि नेमके कोणते कार्य नगरसेवकाकडून अपेक्षित आहे, याचा विचार-विनिमय, चर्चा निश्चितच झाली पाहिजे.
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच म्हणजे नागरिकांनी, नगरसेवकांनी आणि नेतेमंडळींनी त्याचा गांभीर्याने विचार करून त्या सर्व बाबींची गांभीर्याने दखलही घेऊन उमेदवार निवडीला प्राधान्य दिले जावे, अशी सर्वसामान्य नागरिकांची जास्त अपेक्षा आहे.
गेल्या सुमारे 15 वर्षांमध्ये नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी यांची व्याख्याच बदलून गेली आहे. कुठले तरी स्वार्थ घेवून एखाद्या पक्षाचे तिकिट मिळवणे ,व पक्षाचे तो व्यक्ति आपल्या प्रभागाशी किती प्रमाणिक ,कार्यतत्पर आहे हे न तपासता तिकिट विकणे त्या प्रभागशी निकोप समाजाच्या दृष्टीने हे योग्य आहे काय? भविष्याच्या दृष्टीने हे चांगले नाही तसेच समाजहिताचे नाही. नागरिकांनी, विद्यमान नगरसेवकांनी, समाजातील ज्येष्ठ आणि बुध्दिवादी म्हणवून घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि महानगरपालिकेची सत्ता ज्या नेतेमंडळींकडे आहे, त्या नेतेमंडळींनी अतिशय गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्या शहराच्या भविष्यासाठी भावी पिढीच्या हितासाठी दूरदृष्टी ठेवून काही धोरणात्मक निर्णय त्याला घ्यावे लागतील.
खालील बाबीच लक्षात घेऊन आपण आपला “प्रभागाचा वाली निवडून आणूया, आणि संबधित उमेदवाराकडून खालील बाबी या निकषात बसवून घेऊया” आपल्या प्रभागातील महानगरपालिकेशी संबंधित अशा समस्यांची नगरसेवकाला माहिती व जाणीव असावी.
महानगरपालिकेच्या कायद्याची जाण असावी व समजही असावी. महानगरपालिकेस निधी कसा उपलब्ध होतो आणि तो निधी कोणकोणत्या कारणासाठी खर्च करावा लागतो, याचेही ज्ञान नगरसेवकाला असावे. आपल्या शहरामध्ये पुढील 50 वर्षांचा धोरणात्मक दृष्टिकोन ठेवून कायमस्वरूपी कोणती कामे राबवावीत, याचाही अभ्यास नगरसेवकांना असणे अत्यंत आवश्यक आहे. कमीत कमी पैशात महानगरपालिकेमार्फत जास्तीत जास्त सार्वजनिक काम कसे करून घेता येईल, याचाही नगरसेवकांनी जाणीव-पूर्वक प्रयत्न केला पाहिजे.
नागरिकांच्या महानगरपालिकेमार्फत ज्या दैनंदिन गरजा आहेत, त्या गरजांसाठी अभ्यासपूर्ण रितीने व कार्यक्षमतेने नियोजनबध्द असा कायमस्वरूपी कार्यक्रम आखून देणे हे नगरसेवकांचे महत्वाचे काम असून त्यासाठी सर्व नगरसेवकांनी एकत्रितरित्या हा कार्यक्रम, हे धोरण राबविले पाहिजे म्हणजे लहानसहान कामासाठी छोट्या-मोठ्या कामांसाठी नगरसेवकांचा, सेवकवर्गाचा आणि चतुर्थश्रेणी कामगारांच्या वेळेचा अपव्यय होणार नाही.
महाराष्ट्रातील सर्वच नगरपालिकांच्या हद्दीमध्ये पुरेशा रूंद रस्त्याचा अभाव, पार्किंगच्या जागांचा अभाव, वाहतूक यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याचा अभाव आणि विविध सार्वजनिक कारणांसाठी म्हणजे खेळाची मैदाने, प्रदूषण टाळण्यासाठी मोठमोठी उद्याने, सार्वजनिक स्वच्छतागृहे, भाजीमंडई आणि मटण मार्केट यासाठी स्वच्छ व सर्वसोयींनी-युक्त अशी अद्यावत मार्केटस या सुविधांची टंचाई आहे. महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मंजूर डेव्हलपमेंट प्लॅन राबवण्या-साठी एकत्रित प्रयत्न करणे हे देखील नगरसेवकांचे आद्य कर्तव्य आहे.
नागरिकांच्या करमणुकी-साठी अद्यावत टाऊन हॉल, नाट्य मंदिर असणे तसेच विविध कलागुणांना वाव देण्यासाठी थिएटर अगर कला मंदिर असणे आणि त्या दृष्टीने पाठपुरावा नगरसेवकांनी केला पाहिजे.
महानगरपालिकेमार्फत सार्वजनिक हिताची विकासकामे करताना ती टक्केवारीशिवाय झाली पाहिजेत आणि कमीत कमी पैशात जास्तीत जास्त कामे झाली पाहिजेत. महानगरपालिकेचे उत्पन्न जास्तीत जास्त वाढवून महानगरपालिकेच्या अंदाज-पत्रकाचा अभ्यास करून दरवर्षी पुढील वर्षासाठी योग्य ते धोरण ठरवले जावे. राज्य शासन व केंद्र शासन यांच्याकडून शहरातील विविध कामांसाठी कायमस्वरूपी कामांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून आणणे आणि त्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती नगरसेवकांना असावी. नागरिकांच्या दैनंदिन समस्या जाणून घेण्यासाठी किमान 60 दिवसातून एकदा तरी नागरिकांची सर्वसमावेशक अशी, “प्रभाग सभा’ आयोजित करून समस्यांचा आढावा घ्यावा. त्या समस्यांचे निराकरण लवकरात लवकर महानगरपालिकेद्वारे व्हावे.
शहरातील नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी दैनंदिन साफसफाई, स्वच्छता, कचरा व घनकचऱ्याचे निर्मूलन वगैरे सर्व बाबींकडे काटेकारपणे लक्ष द्यावे.
नागरिकांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी जागरूकतेने सर्वच बाबी म्हणजे भारनियमन, पाण्याची वॉल्व्ह सोडणे तसेच जमिनीखालून वेळोवेळी नगरसेवकांच्या किंवा काही वेळा नागरिकांच्या इच्छेप्रमाणे घातल्या जाणाऱ्या पाईपलाईनच्या गुंतागुंतीचा अभ्यास असणे आणि त्यावर एकत्रितरित्या विचार करून ठोस निर्णय घेणे हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक शहरामध्ये स्त्री-पुरूषांसाठी ठिकठिकाणी अद्यावत अशी स्वतंत्र स्वच्छतागृहांची उभारणी व्हावी. ह्या महत्वाच्या काही गोष्टी आहेत, ज्या मतदार बंधु-भगिणींनी आपल्या भावी नगरसेवकांमध्ये ओळखाच्या आहेत. कुठल्याही समाजमनाचा ठाव घेणाऱ्या दर्जाच्या पदावर काम पाहत असताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्या व्यक्तीला प्रभागातील प्रश्न सोडविण्याची मनापासून तळमळ असली पाहिजे. लोकसेवा म्हणजे काय, याचे बाळकडू त्याच्या अंगात भिनलेले पाहिजे. ज्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यास सामान्य नागरिकाला त्याच्या नोकरी-धंद्याच्या व्यस्ततेमुळे वेळ नसतो. तिथे नगरसेवकाने पूर्ण वेळ दिला पाहिजे. उमेदवार शिकलेला असावा किंवा नाही यावर दुमत असू शकेल, पण निश्चितच निवडून आलेल्या उमेदवारात काही जीवनविषयक मूल्ये असावीत. प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम, चिकाटी, जनतेच्या पैशाला विश्वस्त म्हणून न्याय देण्याची क्षमता, ही यापैकी काही मूल्ये सांगता येतील.
शिक्षण असो किंवा नसो नगरसेवकाकडे वेळेचे व्यवस्थापन हे उत्कृष्ट असलेच पाहिजे. निर्थक गोष्टींमध्ये वेळ न घालवता आपल्या मुदतीत जास्तीत जास्त लोकांची कामे कशी करता येतील, याचे व्यवस्थित ज्ञान त्याच्याकडे असले पाहिजे. नगरसेवकाकडे प्रसंगी परखडपणे मत व्यक्त करण्याची क्षमता असली पाहिजे, जर लोकांच्या भल्याचा असेल तर प्रसंगी पक्षश्रेष्ठींचा आदेश धुडकावून निर्णय घेतला पाहिजे. राजकारण हे जरी व्यवस्थेचे मूलभूत अंग असले, तरी उपलब्ध असलेल्या वेळेपैकी किती वेळ राजकारणात घालवायचा व किती वेळ लोकांसाठी द्यायचा, याचा निश्चित आराखडा त्याच्याकडे असला पाहिजे. याव्यतिरिक्त निवडून आल्यावर मिळणारी प्रसिद्धी व पैसा याचा मर्यादित उपभोग नगरसेवकाने घेतला पाहिजे. सुजाण नागरिकांनो मतदान अवश्य करा परिवर्तनासाठी, आयाराम गयारामांना प्रतिबंध करण्यासाठी, लोकशाही खऱ्या अर्थाने सुदृढ करण्यासाठी! आणि नीतिमुल्य जपणाऱ्या राजकारणाला नवं स्वरूप देण्यासाठी हेच खरं रूप आहे , लोकशाहीचा मतोत्सव आज महापालिकेत येऊन पोहचला आहे म्हणून लोकशाहीच्या हितासाठी लेखन प्रपंच ..




















