जळगाव मिरर । ३ डिसेंबर २०२५
घराबाहेर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये विद्युत प्रवाह उतरलेला होता. त्याठिकाणी खेळत असलेल्या प्रेम नरेंद्र सोनवणे (वय ६, रा. सुजदे, ता. जळगाव) या चिमुकल्याला विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का लागून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील सुजदे गावात घडली. या घटनेमुळे चिमुकल्याच्या कुटुंबियांना धक्का बसला असून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील सुजदे गावात नरेंद्र सोनवणे हे वास्तव्यास असून ते शेती करतात, तर त्यांची पत्नी या गृहीणी आहेत. त्यांना सहा वर्षांचा प्रेम आणि एक लहान असे दोन मुले आहेत. प्रेम हा दुपारच्या सुमारास घराच्या बाहेर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये खेळत होता, त्या शेडच्या वरुन मुख्य विद्युत प्रवाह असलेली वायर अचानक तुटल्यामुळे पत्र्याच्या शेडमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. त्याचवेळी प्रेम त्या ठिकाणी खेळत असताना त्याला विजेचा शॉक लागला. हा प्रकार शेजारी राहणाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच विद्युत प्रवाह खंडीत करुन प्रेमला तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत चिमुकल्याला मयत घोषीत केले.
चिमुकल्याचा मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या आईवडीलांना मानसिक धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.





















