जळगाव मिरर | १७ जुलै २०२३
भुसावळ तालुक्यातील खडका येथील जिनिंग मिल परिसरातील एका खोलीमध्ये रविवारी सकाळी एक महिला विवस्त्र व बेशुद्धावस्थेत आढळून आली. भुसावळ तालुका पोलिसांनी तिला जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल केले आहे. या महिलेची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खड़का येथील जिनिंग मिल परिसरातील एका खोलीमध्ये ५९ वर्षीय महिला बेशुद्धावस्थेत पडलेली असल्याची माहिती भुसावळ तालुका पोलिसांना मिळाली. त्या वेळी सहायक पोलिस निरीक्षक रुपाली चव्हाण, पोहेकॉ संजय तायडे, पोकॉ. संगीता निळे हे घटनास्थळी पोहोचले. या महिलेला भुसावळ येथे ट्रॉमा सेंटर येथे नेण्यात आले. नंतर तेथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले. येथे तिच्यावर उपचार सुरू असून भुसावळ तालुका पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणीविषयी पत्र दिले आहे. ज्या ठिकाणी ही महिला बेशुद्धावस्थेत आढळून आली. त्या खडका जिनिंग मिलच्या खोलीमधील भिंतीवर रक्ताचे डाग आढळून आल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे या महिलेला पतीने सोडल्याची माहिती मिळाली. ती सध्या भुसावळ येथेच राहत होती. तिला एक बहीण असून ती रावेर तालुक्यातील एका गावात राहते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ही बहीणदेखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोहोचली. दरम्यान, बहिणीने दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक रुपाली चव्हाण, उपनिरीक्षक पूजा अंधारे आदींनी जबाब नोंदवला. घटनास्थळी पडलेल्या रक्ताचे डाग व अन्य वस्तूंचे फॉरेन्सिक लॅबच्या पथकाकडून नमुने घेण्यात आले.