जळगाव मिरर | ७ एप्रिल २०२४
अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे सहा घरांचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने, पाण्याच्या पंपासह एकूण ३ लाख ६७ हजार रुपयांची घरफोडी केल्याची घटना ६ रोजी पहाटे चार वाजेपूर्वी घडली. चोरट्यांनी गावात आलेल्या एका जावयाला मारहाण करून पोबारा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मांडळ येथे चोरट्यांनी मोतीलाल चुडामन पाटील व कुटुंबीय घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोयंडा तोडून घरातील लॉकर, कपाटांचे कुलूप तोडून त्यांच्यातील २ लाख २० हजार रुपये रोख, ५२ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे टोंगल, १५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ८ हजाराचे चांदीचे कडे व चांदीचे बिस्कीट चोरून नेले. पहाटे उठल्यावर त्यांना घरातील साहित्य व कपडे अस्ताव्यस्त फेकलेले आढळून आल्यावर चोरी झाल्याचे उघडकीस आले तसेच त्यांच्याच शेजारील टिनाबाई हेमंत ठाकूर यांच्या घरचा कडीकोयंडा तोडून सुटकेसमधील १० हजार रुपये, महेश नामदेव ठाकूर यांच्या घरातील ५० हजार रुपये, नरेश मधुकर कुलकर्णी यांच्या घरातील पेटीत ठेवलेले २५ हजार रुपये, गुलाब नीळकंठ पाटील यांच्या शेतातील घरातील २ हजार रुपये किमतीचा पाण्याची पंप, तसेच जगदीश भटू पाटील यांच्याही घरचा कडीकोयंडा तोडून चोरी केली आहे. अज्ञात चोरट्यांनी एकूण ३ लाख ६७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. रात्री युवराज दिगंबर पाटील यांचे जावई राहुल उल्हास पाटील (रा. निंभोरी, ता. पाचोरा) यांनी चोरांना पाहिले व त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यानी त्यांनाही मारहाण केली. त्यानंतर चोरटे पळून गेले. या प्रकरणी नितीन मोतीलाल पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक करत आहेत.