जळगाव मिरर | २६ नोव्हेंबर २०२५
तिवारी नगर परिसरात अवघ्या अर्ध्या तासात चोरट्यांनी बंद घरातील दागिन्यांवर डल्ला मारत ६७ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना २४ नोव्हेंबर रोजी घडली असून रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खासगी नोकरी करणारे विलास दत्तात्रय सैतवाल (५६) हे २४ नोव्हेंबरच्या सकाळी कामावर गेले. त्यानंतर त्यांची पत्नी नीलिमा सैतवाल यांनी सुमारे ११ वाजता घराला कुलूप लावून मंदिराकडे प्रस्थान केले. त्यांच्या अनुपस्थितीत चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले व कपाटातील ऐवजावर ताबा मिळवला. चोरट्यांनी ६० हजार रुपयांची सोनपोत, पाच हजार रुपयांचे चांदीचे शिक्के आणि दोन हजार रुपयांची चांदीची मूर्ती असा मिळून ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सुमारे ११:३० वाजता नीलिमा सैतवाल घरी परतल्या तेव्हा चोरीची घटना उघडकीस आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहेत.




















