जळगाव मिरर । २० नोव्हेंबर २०२५
राजस्थानात नातेवाइकाचे निधन झाल्यामुळे तेथे द्वारदर्शनासाठी गेलेल्या मालचंद गौरीशंकर सोनी यांच्या घरातून चोरट्यांनी रोख ५० हजार रुपयांसह १५ लाख २० हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने लांबविले. ही घटना १९ नोव्हेंबर रोजी गीताईनगरात सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि , सुवर्ण कारागीर असलेले मालचंद सोनी यांचे गिताईनगर येथे घर आहे. १५ नोव्हेंबर रोजी राजस्थानात त्यांच्या नातेवाईकाचे निधन झाल्याने १८ नोव्हेंबर रोजी सोनी हे कुटुंबासह तेथे गेले. त्याच रात्री चोरट्यांनी दरवाजाचा कोंडा कापून आत प्रवेश केला. चोरट्यांनी रोख ५० हजार रुपयांसह सोन्याच्या बांगड्या, ब्रेसलेट, झुमके, चेन यासह वेगवेगळे १४ तोळे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ७० हजार रुपये किमतीचे ७०० ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण १५ लाख ७० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. बुधवारी (दि. १९ नोव्हेंबर) सकाळी सोनी यांच्या शेजारी राहणारे अशोक – सोनी यांनी त्यांना फोन करुन तुमच्या घरी चोरी झाल्याचे सांगितले. त्यानुसार सोनी यांनी त्याच परिसरात राहणारा त्यांचा पुतण्या नरेंद्र सोनी याला घरी जावून पाहणी करण्यास सांगितले. नरेंद्र सोनी हे काकांच्या घरी पोहोचल्यानंतर वरील ऐवज गायब असल्याचे आढळले.
मध्यरात्री बंद घरात चोरी झाल्याची माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाली. उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, सहायक निरीक्षक साजीद मन्सूरी, उपनिरीक्षक योगेश ढिकले व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. तसेच फॉरेन्सिक टीमसह श्वान पथक दाखल झाले होते. ज्या ठिकाणी ही घरफोडी झाली त्या परिसरात कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नाही. ज्ञानदेव नगराच्या मुख्य रस्त्यावर कॅमेरे असून पोलिसांकडून तेथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.




















