जळगाव मिरर | ६ एप्रिल २०२५
अमळनेर शहरात भरदिवसा दमबाजी करून धुळ्याच्या एकाकडून दोन हजार रुपये बळजबरीने काढून घेतल्याची घटना ४ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पाचकंदील चौकातील शीतल बियरबार जवळ घडली होती. यात पोलिसांनी रात्री ९ वाजता आरोपीस ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथील नगाव बारी परिसरातील एकलव्य चौकातील विनोद कैलास ठाकरे हे आपला मित्र ज्ञानेश्वर भुरा मोहिते, ईश्वर अभिमन मोरे यांना घेऊन घराचे बांधकाम ठरवण्यासाठी अमळनेरात आले होते. पाचकंदील चौकात त्यांचे पेट्रोल संपले म्हणून ते शीतल हॉटेल जवळ थांबले होते. त्यावेळी तेथे तीन जण आले अन् त्यांनी दुचाकीची चावी काढून घेतली. तसेच त्यांनी ठाकरे यांच्या खिशात हात घालून पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला. ठाकरे पैसे ईश्वर मोरे यांच्याकडे देत असताना एकाने पैसे हिसकावून घेतले. तसेच चावी देवून चुपचाप निघून जाण्यासाठी दादागिरी केली. याप्रकरणी विनोद ठाकरे याने अमळनेर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, पीएसआय नामदेव बोरकर, मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, अमोल पाटील, गणेश पाटील, उज्ज्वल म्हस्के, प्रशांत पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता या घटनेतील आरोपी हे मोझम शेख शब्बीर शेख, जितू रमेश चव्हाण (दोन्ही रा. गांधलीपुरा) असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना रात्री ९ वाजेच्या सुमारास अटक केली. तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करत आहेत.