
जळगाव मिरर | २४ एप्रिल २०२५
जळगाव जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयात लाचखोरीच्या घटना सातत्याने घडत असतांना आता प्लंबर परवान्याच्या नूतनीकरणासाठी सातशे रूपयांची लाच मागून तडजोडीवर सहाशे रूपये स्वीकारण्याचा मोह भुसावळ नगरपालिकेच्या पाणी पुरवठा अभियंत्यासह लिपीक व कंत्राटी कर्मचाऱ्याला भोवला असून त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, भुसावळ शहरातील एका प्लंबरचा परवाना हा संपल्याने याच्या नूतनीकरणासाठी ते नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागात गेले होत्ो. येथे कंत्राटी कर्मचारी शाम भगवान साबळे याने त्यांना पैसे द्यावे लागतील असे सांगितले. त्याने पाणी पुरवठा अभियंता सतीश सुरेशराव देशमुख यांना कॉल केला असता त्यांनी या कामासाठी सातशे रूपये लागतील असे सांगितले. यावर बोलणी होऊन सहाशे रूपये देण्याचे पंचाच्या समक्ष ठरले. दरम्यान, साबळे यांनी पाणी पुरवठा विभागातील लिपीक शांताराम उखर्डू सुरवाडे यांना कॉल करून सहाशे रूपये घेण्यासाठी बोलावले. सुरवाडे हे सहाशे रूपये स्वीकारत असतांना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहात अटक केली.
या प्रकरणी नगरपालिकेचा कंत्राटी कामगार शाम समाधान साबळे, पाणी पुरवठा अभियंता सतीश सुरेशराव देशमुख आणि लिपीक शांताराम उखर्डू सुरवाडे या तिघांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
आजची कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे डीवायएसपी योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक नेत्रा जाधव, उपनिरिक्षक सुरेश पाटील, दिनेशसिंग पाटील, शैला धनगर, बाळू मराठे, राकेश दुसाने, प्रदीप पोळ यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.