
जळगाव मिरर | ३ मार्च २०२६
रावेरला सोडतो असे म्हणत कारमध्ये बसवून घेत त्याला चाकूचा धाक दाखवून सलमान खान अमानउल्ला खान (वय ५२, रा. निंभोरा, ता. रावेर) याच्या खिशातून ९ हजार ७०० रुपये जबरीने काढून घेतले. ही घटना अजिंठा चौफुली ते प्रितम पार्क दरम्यान घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच एलसीबीच्या पथकाने वाहन चालक शंभू पाटील याला अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे.
मिळालेल्या मह्हितीनुसार, रावेर तालुक्यातील निंभारा येथे राहणारे सलमान खान हे दि. २८ रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास रावेर येथे जाण्यासाठी अजिंठा चौफुली परिसरात उभे होते. यावेळी त्याठिकाणी आलेल्या कारमधील चालकाने शंभर रुपये द्या तुम्हाला रावेरला सोडतो असे म्हणत सलमान खान यांना कारमध्ये बसवून घेतले. कार भुसावळ रस्त्यावरुन जात असतांना काही अंतरावर गेल्यानंतर कारमध्ये मागच्या सीटवर बसलेल्यांनी सलमान खान यांचे हात पकडून ठेवले तर एकाने चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातून ९ हजार ७०० रुपये जबरीने काढून घेतले.
पैसे जबरीने काढून घेतल्यानंतर सलमान खान यांना रस्त्यात उतरवून देत, संशयित तेथून पसार झाले. सलमान खान हे लागलीच एमआयडीसी पोलीस ठाण्यात जावून त्यांनी पोलिसांना आपबिती कथन केली. पोलिसांनी घटनेची माहिती जाणून घेत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दि. १ रोजी अज्ञात चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी उपनिरीक्षक शरद बागल, सफौ अतुल् वंजारी, पोहेकॉ विजय पाटील, अक्रम शेख नितीन बाविस्कर, किशोर पाटील, रविंड कापडणे, राहूल रगडे, छगन तायडे, प्रदी चवरे यांचे पथक तयार केले.
या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर कारचा नंबर निष्पन्न करीत वाहन चालक शंभू पाटील याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्यात वापरलेले वाहन काढून दिले असून ते पोलिसांनी जप्त केले. तर त्याच्या साथीरांना देखील निष्पन्न केले असून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. या गुन्ह्यातील संशयित हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत.




















