
जळगाव मिरर | १५ एप्रिल २०२५
यावल येथे गोंधळाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या महिला नदीवर अंघोळीसह कपडे धुण्याकरीता गेल्या होत्या. त्याठिकाणी डोहात पाय घसरुन वैशाली सतीष भिल (वय २८), त्यांचा मुलगा नकुल सतिष भिल (वय ५, रा. अंतुर्ली, ता. अमळनेर) याच्यासह सपना गोपाल सोनवणे (वय २७, रा. पळाशी, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजी नगर) यांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना अंजाळे गावाजवळील नदीपात्रात घडली. या घटनेमुळे खळबळ माजून गेली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, यावल तालुकयातील अंजाळे गावाजवळील नदीपात्राजवळ घाणेकर नगर असून याठिकाणी राहणारे बादल भिल यांच्याकडे गोंधळाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी वैशाली भील त्यांचा मुलगा नकूल यांच्यासह सपना सोनवणे हे देखील आले होते. गोंधळाचा आटोपल्यानंतर कार्यक्रम सोमवारी दुपारी सव्वा बारा वाजता ते अंजाळे शिवारातील तापी नदीच्या पात्रात अंघोळीसह कपडे धुण्याकरीता गेल्या होत्या. याठिकाणी डोहात अंघोळ करतांना त्यांचा पाय घसरुन ते डोहात बुडाले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ नदीपात्राजवळ धाव घेतली. त्यानंतर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, उपनिरीक्षक मसलोद्दीन शेख, अर्षद गवळी, इस्तीयाक सय्यद, अनिल पाटील, उमेश महाजन हे देखील घटनास्थळी दाखल झाले.
ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी डोहात बुडालेल्या तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर मृतदेह यावल ग्रामीण रुगणालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी शव विच्छेदन करीत मृतदेह रात्री आठ वाजता त्यांच्या कुटुंबाला सोपविल्यानंतर रात्री गावात शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्देवी मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.




















