
जळगाव मिरर | ३१ मार्च २०२६
सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी पायी गडावर जात असताना विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय भाविकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कळवण तालुक्यातील भेंडी गावात घडली. या दुर्दैवी घटनेमुळे चौगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. परेश धर्मा पवार (वय १७, रा. चौगाव, ता. कळवण) असे मृत भाविकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चौगाव येथील सुमारे २५ ते ३० भाविक २६ तारखेपासून पायी पदयात्रेद्वारे वणी येथील सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी निघाले होते. या पदयात्रेत परेश पवार हाही सहभागी होता. २९ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजेच्या सुमारास कळवण तालुक्यातील भेंडी येथे भाविकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भंडाऱ्यात परेश गेला होता. यावेळी मंडपाच्या लोखंडी पाईपला त्याचा अचानक स्पर्श झाला. त्या पाईपमध्ये विद्युत प्रवाह असल्याने त्याला जबर विजेचा धक्का बसला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती मयताचा भाऊ पंकज पवार यांनी दिली.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. भाविकांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत परेशचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे पदयात्रेत सहभागी असलेल्या सर्व भाविकांवर शोककळा पसरली असून त्यांनी गडावर जाण्याचा निर्णय रद्द करून परत गावाकडे प्रयाण केले. दरम्यान, ३० मार्च रोजी चौगाव येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात परेश पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील व कुटुंबीय असा परिवार आहे. या प्रकरणी कळवण पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सप्तशृंगी गडाकडे जाणाऱ्या मार्गावर भाविकांसाठी विविध ठिकाणी भंडाऱ्यांचे आयोजन केले जाते. मात्र, या घटनेमुळे अशा ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





















