जळगाव मिरर | १० मार्च २०२५
श्रीक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिराजवळ वरणगाव ते बोदवड रस्त्यावर दोन दुचाकीची समोरासमोर जबर धडक झाल्याने जखमीना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता एकाचा मृत्यू झाला. तर दोन जखमीना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असुन एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. तर यावेळी अपघातातील मृत व्यक्तीवर वेळीच उपचार झाले असते तर त्यांचे प्राण वाचले असते असा आरोप करीत नातेवाईकांनी काही वेळ रुग्णालयात दांगडो केला होता.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की दि ९ रविवार रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तालुक्यातील आचेगांव येथील शरद भास्कर पाटील ( वय – ७० ) हे आपल्या दुचाकी क्र. एम. एच. १९ / ए. एस ६९९१ ने वरणगाव कडून आचेगावकडे जात असतांना बोदवड मार्गावरील श्री नागेश्वर मंदिराजवळ समोरून येणाऱ्या दुचाकी क्र. एम. एच. २८ /बी. एस. ९१४१ वरील चालक शेख गनी शेख मन्यार ( वय – ६६ ) त्यांचे सोबत असलेल्या अशोक रामदास खराटे ( वय – ५५ ) दोघे रा. बोदवड यांनी जबर धडक दिल्याने या अपघातात आचेगाव येथील गंभीर जखमी झालेल्या तिघांना वरणगांव ग्रामीण रुग्णालयात आणले असता शरद भास्कर पाटील यांना खासगी डॉक्टरांनी मृत घोषित केले.
गंभीर जखमी झालेल्या शेख गनी शेख मन्यार व अशोक रामदास खराटे या दोघांना उपचारार्थ जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, यावेळी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी हजर नसल्याने शरद पाटील यांच्यावर वेळीच उपचार न झाल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचा आरोप करीत मृताच्या नातेवाईकांनी काही वेळ रुग्णालयात दांगडो केला. तर या अपघाताच्या घटने प्रकरणी वरणगाव पोलिसात नोंद करण्यात आली असून घटनेचा सपोनि जनार्दन खंडेराव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्रावण जवरे तपास करीत आहे.
अपघातानंतर काही जणांनी तातडीने जखमींना वरणगांव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. योगेश अहीरे हे काही वेळ बाहेर गेले होते. यामुळे त्यांना येण्यास थोडा उशीर झाल्याने खासगी रुग्णालयाचे डॉ अनंत फेगडे व डॉ. पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन जखमीची तपासणी केली असता शरद पाटील यांना मृत घोषित केले तर उर्वरीत दोन्ही गंभीर जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. यामध्ये शेख गणी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. तर अपघातातील मृताच्या नातेवाईकांनी वेळीच उपचार न मिळाल्याने पाटील यांचा मृत्यु झाल्याचा आरोप करीत काही वेळ रुग्णालयात दांगडो केला होता. मात्र, त्यानंतर शांतता निर्माण होवून मयताचे शवविच्छेदन करण्यात आले. तर या घटनेची माहिती राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांना मिळताच त्यांनी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात भेट देवून परिस्थिती जाणून घेतली व वैद्यकिय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुचना दिल्या आहेत.