जळगाव मिरर | १० मे २०२४
डब्बा खरेदी करण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून भांडे विक्रेत्यावर दोन अनोळखी इसमांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये विनोद माधव वाघ (वय ४९ रा. शिव कॉलनी) हे गंभीर जखमी झाले. ही घटना दि. ८ मे रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास पोलन पेठ परिसरात घडली. वार केल्यानंतर विक्रेत्याला मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अनोळखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवकॉलनी परिसरात विनोद माधव वाघ हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून त्यांचे पोलन पेठेत भांडे विक्रीचे दुकान आहे. भांडे विक्री करुन ते आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार दि. ८ मे रोजी दुपारी ४ वाजता विनोद वाघ हे दुकानात भांडे विक्रीसाठी बसलेले होते. त्यावेळी दुकानात अनोळखी दोन जण आले. दुकानात असलेला डब्बा खरेदीसाठी हातात घेतला. त्यावेळी दुकानदार यांनी दोघांना डब्बा घ्यायचा आहे का, डब्या घ्यायचा असेल तर हातात डब्बा उचला, नाहीतर डब्बा खाली ठेवा असे सांगितले. त्याचा राग आल्याने अनोळखी दोघांनी दुकानदाराला शिवीगाळ करत धारदार वस्तूने वार करून मारहाण केली. आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर भांडे विक्रेते विनोद वाघ यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात रात्री अनोळखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रकाश पाटील हे करीत आहे.
