
जळगाव मिरर | ८ ऑक्टोबर २०२४
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून त्यातून नफ्याचे अमिष दाखवत जळगावातील दोघ बहिणींची सहा लाख पाच हजार रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. सुरुवातीला दोघींना १ लाख पाच हजार रुपयांचा नफा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला, मात्र त्यानंतर त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली. ही घटना दि.२१ ऑगस्ट ते दि. १३ सप्टेंबरदरम्यान घडली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील दादावाडी परिसरातील गृहिणी असलेल्या महिलेसह तिच्या बहिणीसोबत दोन जणांनी व्हाटसअॅपद्वारे संपर्क साधला. त्यानंतर त्या दोघींना एका ग्रुपमध्ये अॅड करुन घेतले. काही दिवासनंतर त्या दोघ महिलांना एक लिंक पाठविली आणि त्याद्वारे एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. समोरील ऑनलाईन ठगांनी सांगितल्याप्रमाणे त्या दोघ महिलांनी मोबाईलमध्ये अॅप्लिकेशन डाऊनलोड करुन घेतले. त्यानंतर महिलेला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. दोघं बहिणींनी काही रक्कम गुंतविली. एकीला ३० हजार तर दुसरीला ७५ हजार रुपयांचा नफा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दोघींकडून एकूण सहा लाख पाच हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या बँक खात्यांवर स्वीकारले.
गुंतविलेली रक्कम व नफाही मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले व त्यानंतर दादावाडी परिसरातील महिलेने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चार अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहेत.





















