
जळगाव मिरर | १५ मे २०२५
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना नियमित घडत असतांना आता नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात नगरसोल येथील वडाचा मळा परिसरात राहणारे किशोर ओंकार सोनवणे आणि त्यांचा मुलगा ऋतिक किशोर सोनवणे यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत त्यांचा पुतण्या रवींद्र बाळू सोनवणे हा देखील होता. तो देखील गंभीर जखमी झाला आहे. हे तिघे देवदर्शनासाठी मोटरसायकल वरून गेले होते. मात्र परत येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.
सविस्तर वृत्त असे कि, नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे आज पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वडील आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यात त्यांचा पुतण्याही गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने मनमाड आणि परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 40 वर्षीय किशोर ओंकार सोनवणे हे त्यांचा मुलगा 11 वर्षीय ऋतिक किशोर सोनवणे आणि पुतण्या 27 वर्षीय रवींद्र बाळू सोनवणे यांना देवदर्शन घेऊन गेले होते. मात्र परत येत असताना त्यांच्या गाडीला पाठीमागून देणाऱ्या पिकअप गाडीने जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये किशोर आणि ऋतिक यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रवींद्र हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर पिकअप चालकाने मोटरसायकल जवळपास चार किलोमीटर पर्यंत फरफटत नेली. मालेगाव चौफुलीवर वाहतूक पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून अखेर पिकअपला ताब्यात घेतले. मात्र चालक फरार झाला आहे. याप्रकरणी मनमाड पोलिस ठाण्यामध्ये अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून चालकाचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करून शिक्षा करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.




















