
जळगाव मिरर | ११ एप्रिल २०२६
पथराड रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वार वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सतीश काशिनाथ जोशी (वय ७५) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते नांदेड साळवा येथे आयोजित भागवत सप्ताहाचा कार्यक्रम आटोपून जळगाव येथील आपल्या मुलीकडे दुचाकी (एमएच-१९, एव्ही-४०४५) ने जात होते. दरम्यान, पथराड रस्त्यावरील पाटाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात जोशी हे रस्त्यावर खाली पडले आणि गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवले.
दरम्यान, मृताच्या खिशात असलेले सुमारे १५ हजार रुपये सुरक्षितरित्या त्यांच्या पुतण्याच्या ताब्यात देण्यात आले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये भरधाव डंपरने चिरडल्याची चर्चा होती. या प्रकरणी पाळधी पोलिसांत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.





















