
जळगाव मिरर | २५ एप्रिल २०२५
राज्याच्या राजकारणात नेहमीच शरद पवार गट अनेकदा चर्चेत येत असतांना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या प्रवक्त्यांचे पॅनेल बरखास्त केले आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या हवाल्याने पीटीआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. मागील काही दिवसांपासून पक्षामध्ये नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर या नियुक्त्या रद्द करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, 16 एप्रिल रोजी पक्षाच्या बैठकीत पानिपत येथे सरकारकडून बनवण्यात येणाऱ्या स्मारकाला समर्थन नको अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली, याला मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी कडाडून विरोध केला. बैठकीत वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेला केलेला विरोध पाहता महेश तपासे यांची मुख्य प्रवक्ता पदावरून उचलबांगडी करण्यासाठी सर्वच प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे, महेश तपासे यांचे आजोबा आणि माजी राज्यपाल गणपत तपासे यांनीच पानिपत येथे पूर्वी शौर्य स्मारक उभारले होते. त्यामुळे महेश तपासे यांनी केंद्र सरकारच्या स्मारकाला पाठिंबा दिला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षात मतभेद निर्माण झाले आणि नेत्यांच्या नाराजीला तोंड द्यावे लागले असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या संदर्भातले आदेश दिले आहेत. मात्र, अचानकपणे सर्व प्रवक्त्याच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्यामुळे याविषयी राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.