जळगाव मिरर | २७ जून २०२४
राज्याच्या राजकारणातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नांदुरा-जळगाव जामोद मार्गावरील आसलगाव-खांडवीदरम्यान मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. पहारीने कारच्या काचाही फोडल्या. यात सुदैवाने त्यात ते बचावले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वंचितचे युवा महासचिव प्रकाश भिसे व तालुका उपाध्यक्ष सुनील बोदडे हे नांदुऱ्यावरून आपल्या गावाकडे येत असताना दोन अज्ञात व्यक्तींनी येऊन त्यांच्या वाहनासमोर दुचाकी आडवी लावली आणि गोळीबार केला. प्रकाश भिसे यांनी समयसूचकता दाखवल्याने ते व बोदडे वाचले. बोदडेंनी घटनेची माहिती आपल्या सहकाऱ्यांसह जळगाव जामोद पोलिसांना दिली. मग ठाणेदार आनंद महाजन यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व वाहन पोलिस ठाण्यात नेण्यात आले. हल्ला कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
रस्त्यात दुचाकी आडवी लावून गोळीबार करून वाहनाचे नुकसान करणाऱ्या अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी भिसेंकडून माहिती घेतली जात आहे. जळगाव तालुक्यात राजकीय पदाधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याची ही पहिलीच घटना आहे. या हल्ल्यात वाहनातून प्रवास करणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश भिसे, सुनील बोदडे व त्यांच्या सोबत असलेले सहकारी सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले.