
जळगाव मिरर | ६ जून २०२४
देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल धामधूममध्ये लागला असून आता एक मोठी बातमी अहमदनगरमधून समोर आली आहे. लोकसभेच्या निकालानंतर सुजय विखे व निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यामध्ये जोरदार राडा झाला असून निलेश लंके यांचे स्विय सहाय्यक राहुल झावरे यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर पारनेरमध्ये जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. नगर दक्षिण लोकसभेचे विजयी उमेदवार निलेश लंके आणि प्रतिस्पर्धी उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या समर्थकांमध्ये हा राडा झाला. यावेळी निलेश लंके यांच्या स्वीय सहाय्यकावर प्राण घातक हल्ला करण्यात आला. खासदार निलेश लंके यांचे स्विय सहाय्यक राहुल झावरे यांच्यावर सुजय विखे समर्थक विजय औटी सह आठ ते नऊ जणांनी केला हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी झावरे यांची गाडीही फोडण्यात आली. मारहाणीत झावरे किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, ४ जून रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके हे जायंट किलर ठरले असून त्यांनी विखेंचा बालेकिल्ला भेदत सुजय विखे यांचा पराभव केला. या निकालाची संपूर्ण राज्यात चर्चा असून विखे पिता- पुत्रांसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.




















