जळगाव मिरर । २५ नोव्हेबर २०२२
बुधवारी दुपारी विक्रम गोखले यांची तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर रात्रीपर्यंत त्यांच्या निधनाची अफवा वणव्यासारखी सोशल मीडियावर पसरली. त्यानंतर अभिनेत्याच्या पत्नी वृषाली यांनी माहिती देत हे वृत्त फेटाळून लावले. त्यांच्या मुलीनेही विक्रम गोखलेंची तब्येत चिंताजनक असल्याचे म्हटले. विक्रम यांचे कौटुंबिक मित्र राजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम गोखले यांचे अनेक अवयव निकामी झाले आहेत.
आज उघडले डोळे
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना भरती करण्यात आलं होतं. यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचं सांगत गोखले यांची प्रकृती चिंताजनक असल्याचंही बोललं जात होतं. आता २५ नोव्हेंबर रोजी रुग्णालयाने विक्रम गोखले यांच्या प्रकृतीची माहिती दिली.
रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याद्गीकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत आहे. ते उपचारांना प्रतिसाद देत असून त्यांनी डोळे उघडले आणि हात- पायही हलवले. तसेच पुढील ४८ तासात त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढण्यात येईल. तसेच त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रिया स्थिर आहे.’ दरम्यान, गोखले यांच्यावर क्रिटिकल केअर यूनिटमध्ये उपचार केले जात आहेत.
