
जळगाव मिरर | ६ जुलै २०२५
पाचोरा शहरातील येथील बसस्थानक परिसरात एका तरुणावर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी गावठी कट्याने १२ राऊंड फायर केले होते. यात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. तर दुचाकीवरुन आलेले दोघे मारेकरी हत्येनंतर फरार झाले होते. हे दोन्ही मारेकरी पोलिसांना स्वतःहून शरण आले आहेत. दरम्यान, मयत तरुणावर आज शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा बस स्थानक परिसरात ४ जुलैला सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आकाश कैलास मोरे (वय २६) या तरुणावर नीलेश उर्फ राव अनिल सोनवणे व एका अल्पवयीन तरुणाने गावठी कद्वयाने १२ राऊंड फायर केले होते. यात आकाश मारे यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दरम्यान, घटनास्थळावरून दोन्ही मारेकरी पसार झाले होते. दरम्यान, रात्री १०.३० वाजेच्या सुमारास या घटनेतील दोन्ही आरोपी जामनेर पोलिस ठाण्यात स्वतःहून शरण आले होते. यातील अल्पवयीन तरुणास बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. तर पाचोरा येथील जनता वसाहत येथे राहणाऱ्या नीलेश उर्फ राव अनिल सोनवणे यास ५ जुलैला पाचोरा न्यायालयात हजर केले होते.
न्यायालयाने त्यास ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, ४ जुलैला सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आकाश मोरे यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर या घटनेत आकाश मोरे यांचा जागीच मृत्यू झाला होता. ही माहिती मिळताच व घटनेचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी भेट दिली होती. तसेच आकाश मोरे यांच्या मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले होते. तर ४ जुलैला रात्री आकाश मोरे यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला होता. शवविच्छेदन करुन ५ जुलैला सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास आकाश मोरे यांचा मृतदेह शिवाजी नगर येथील राहत्या घरी आणला, त्या वेळी कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता आकाश मोरे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.




















