जळगाव मिरर | १४ जुलै २०२४
छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि स्वराज्याचे संरक्षण करणारा विशाळगड आज संकटात आहे. मी एक शिवभक्त आहे आणि शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी विशाळगडावर जाण्यापासून मला कोणी थांबवू शकत नाही, असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. आज (दि. १४) सकाळी भवानी मंडप येथे तुळजाभवानीच्या दर्शनानंतर संभाजीराजे विशाळगडाकडे रवाना झाले. तत्पुर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीवरून संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. छत्रपती शिवाजी चौक येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आणि तुळजाभवानीचे दर्शन करून संभाजीराजे विशाळगडाकडे रवाना झाले. “विशाळगडावर झालेले अतिक्रमण खपवून घेणार नाही. गड अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. आज विशाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी जात आहे. मी शिवभक्त आहे. शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी मला जाण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. माझ्यावर गुन्हा नोंद झाला तर मला अभिमान आहे. पण जबाबदारी ही प्रशासनाची आहे,” असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याची मागणी करूनही जिल्हा प्रशासन व राज्य शासनाने अद्याप काहीही प्रतिसाद दिलेला नाही. या अतिक्रमणाबाबत एकही सुनावणी न घेणारे राज्य शासन दीड वर्ष झोपा काढत होते का, असा खडा सवाल माजी खासदार संभाजीराजे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला होता. आज शिवभक्तांसह विशाळगडावर जाणारच, असे त्यांनी ठामपणे सांगितले होते. विशाळगडावर १५८ बांधकामांचे अतिक्रमण आहे. यापैकी सहाजण न्यायालयात गेले आहेत. मग उर्वरित अतिक्रमकणे का हटवली जात नाहीत? पुरातत्त्व विभागाची जागा असतानाही त्यांच्या परवानगीशिवाय संबंधित तहसीलदारांनी बांधकामाला परवानगी दिली आहे. विशाळगड हे काही लोकांसाठी हिल स्टेशन झाले आहे. काहीजण बकरी, कोंबडे कापतात. मद्य प्राशन केले जाते, हे कसे काय खपवून घेतले जाते, या सर्वांना कोणाचा वरदहस्त आहे, असे सवाल त्यांनी केले. दीड वर्षापासून विशाळगडावरील अतिक्रमण काढा, अशी मागणी शिवभक्त करत आहेत. पण जिल्हा प्रशासन व राज्य शासन त्याची दखल घेत नाही. या प्रकरणातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मी करत नाही. येथे कोणत्याही एका समाजाचे अतिक्रमण नाही; तर सरसकट सर्व अतिक्रमण काढावे अशी भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले आहे.