जळगाव मिरर | २ डिसेंबर २०२५
राज्यातील बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात आज 264 नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून उद्या, बुधवारी मतमोजणी होणार आहे. सुमारे 1 कोटी मतदार 6042 सदस्य आणि 264 नगराध्यक्षांची निवड आज ठरवणार आहेत. गेल्या पंधरादिवसांपासून राजकीय रणधुमाळी सुरू असून सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी (मविआ) मैदानात उतरल्यानंतरही अनेक ठिकाणी महायुतीच परस्परविरोधात उभी असल्याचे स्पष्ट चित्र दिसले.
जळगावात मतदान प्रक्रियेला चांगली सुरुवात झाली असून 17 नगराध्यक्ष पदासाठी 177 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने 7000 कर्मचाऱ्यांची नेमणूक करत मोठी तयारी केली आहे. राज्यातील अनेक मतदान केंद्रांवर दिवसाच्या सुरुवातीपासूनच EVM मशीनमध्ये तांत्रिक बिघाड दिसून आला. पहाटेपासून रांगा लावून उभ्या असलेल्या मतदारांना अनेक ठिकाणी प्रतिक्षा करावी लागली. काही यंत्रणा पूर्णपणे बंद पडल्याने मतदान तात्पुरते थांबवावे लागले असून प्रशासनाकडून दुरुस्तीचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. मोठ्या तयारीच्या दाव्यांनंतर मशीन बिघाडामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मालवण नगरपरिषदेतील मतदानात अनोखे दृश्य पाहायला मिळाले. लग्नसोहळ्यात असतानाही दोन वधूंनी भंडारी स्कूल मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. नंदुरबार जिल्ह्यात तळोदा नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी एक नवरदेव बोहल्यावर चढण्याआधी मतदान करून लोकशाहीला मानाचा मुजरा दिला.
राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध दाखल अपीलांच्या कारणास्तव 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतदान प्रक्रिया आज होत नाही. या ठिकाणी सुधारित कार्यक्रमानुसार 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. तसंच 76 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील न्यायालयीन वादामुळे 154 जागांचे मतदान देखील पुढे ढकलले गेले आहे.




















