छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्यात महापुरुषांचा अवमान व औरंगजेबाच्या मुद्यावरून सुरू असणाऱ्या वादावरून आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी भाष्य केले. औरंगजेब हा निव्वळ नालायक होता. त्याने येताना आमची अनेक मंदिरे पाडली. ती पैदास काय चांगली होती का? मराठ्यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याला अजून का अटक झाली नाही. सरकार आपल्या सगेसोयऱ्यांना वाचवत आहे का? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला.
मनोज जरांगे यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथे ते पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण व पैसे सरकारच देत आहे. औरंगजेब हा निव्वळ नालायक माणूस होता. त्याने येताना आमची अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. ती पैदास चांगली होती का? औरंगजेबाची कबर काढायची तर काढा. काय करायचे ते करा. बाबरी मशिदीचे काय केले? प्रत्यक्ष कृती करणारे केव्हाच त्याचा गवगवा करत नाहीत. मागील 40 वर्षे यांना कबर काढण्यास जमले नाही. आता महापालिकेच्या तोंडावर असे विषय काढत आहेत. सरकार निवडणुकीच्या तोंडावर औरंगजेबाची कबर पाडू अशी नवनवी पिल्ले आणत आहे.
प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजाविषयी अवमानास्पद विधान केले. त्याने मराठ्यांना धमकी दिली. त्याला अजून तुरुंगात का डांबले नाही. तुम्ही तुमच्या सग्यासोयऱ्यांना वाचवत आहात का? असे ते म्हणाले. मनोज जरांगे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले. छगन भुजबळ हे सडलेल्या डोक्याचे आहेत. त्यांच्या डोक्यात केवळ जातीभेद आहे. सर्वांनी मिळून चुकणाऱ्यांचे कान धरले पाहिजे. गुन्हे करणारा आपला बाब्या असे सध्या सुरू झाले आहे. पण भुजबळांचे जातिवादाचे स्वप्न केव्हाच पूर्ण होणार नाही. छगन भुजबळांसारख्या जातीयवादी लोकांनी पहिल्यांदा वाद घडवून आणले. आता ते किनाऱ्यावर बसून नाटक पाहत आहेत.
ते पुढे म्हणाले, अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मी स्वस्थ बसणार नाही. सरकारने सर्वांना तत्काळ प्रमाणपत्र द्यावेत. सरकारने आरक्षणाप्रकरणी नियुक्त केलेली शिंदे समिती काम करत नाही. सरकारने माझे उपोषण सोडवताना गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यांनी अद्याप त्याची पूर्तता केली नाही. सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा. मराठा आमदारांनीही अधिवेशनात हा मुद्दा उचलून धरून सरकारला कोंडीत पकडावे. सर्वच पक्षाच्या मराठा आमदारांनी या प्रकरणी आपला जोर लावला पाहिजे.