जळगाव मिरर | ५ मे २०२४
येत्या विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहा असे आवाहन करत विधानसभा निवडणुकीसाठी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांची उमेदवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल यांनी जाहिर केली.
तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटिल यांना विधानपरिषद मध्ये संधी देण्यात येईल असे सांगितले रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटिल यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रचारसभा मुक्ताईनगर येथे पार पडली.
या सभेत मार्गदर्शन करताना आपल्या भाषणात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल यांनी येत्या सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या उमेदवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे असतील अशी घोषणा केली.
यावेळी जयंत पाटिल म्हणाले मला आठवतं नाथाभाऊ खडसेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी पवार साहेबांच्या समोर रोहिणी खडसे यांनी सांगितलं की, नाथाभाऊंना कुठे जायचं तिकडे जाऊ दे, पण पवार साहेब मी तुमच्याच नेतृत्वाखाली काम करणार आहे. काही झालं तरी मी तुमच्यासाठी काम करणार आहे. वडिलांनी वेगळा निर्णय घेतलेला असताना मुलीने वेगळा निर्णय घेणे हे सोप्पं काम नाही. पण रोहिणीताईंनी तो निर्धार केला. पवार साहेबांनी त्यांना आशीर्वाद दिले आहेत. या विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकसभेला आपल्या उमेदवाराला तुम्ही लीड द्याल यात शंका नाही. पण उद्याच्या विधानसभेला देखील रोहिणीताई या आपल्या पक्षाच्या उमेदवार म्हणून इथे उभ्या राहणार आहेत. त्यांच्या मागे देखील तुम्हाला सगळ्यांना ताकदीन उभे राहावे लागेल, असे जयंत पाटील म्हणाले यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ असताना 12 फेब्रुवारी 2022 मध्ये राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने मुक्ताईनगर येथे जयंत पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते त्या सभेत देखिल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रोहिणी खडसे या उमेदवार असतील अशी घोषणा केली होती.
त्यावेळी ते म्हणाले होते रोहिणी खडसे यांचा पराभव करून त्यांचे जे नुकसान मागच्या (2019च्या विधानसभा) निवडणुकीत आम्ही केलं, ते आगामी विधानसभा निवडणुकीत व्याजासकट भरुन काढू. 15 टक्के मताधिक्याने रोहिणी खडसेंना निवडून आणू. त्यासाठी संपूर्ण ताकद राष्ट्रवादी काँग्रेस उभी करेल असे म्हणत विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवारी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून रोहिणी खडसे यांना जाहीर केली होती.
रोहिणी खडसे यांनी 2019 मध्ये मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपा च्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी अल्पमतांनी त्यांचा पराभव झाला होता पराभव झाल्यानंतर पराभवाने खचून न जाता रोहिणी खडसे यांनी दुसऱ्या दिवसांपासून मतदार संघात राजकीय सामाजिक कार्य सुरू केले होते.
त्यानंतर 2022 मध्ये त्यांनी एकनाथराव खडसे यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आपल्या मतदारसंघात शेवटच्या घटकापर्यंत जनसंपर्क करण्याचा त्यांच्या प्रयत्न असतो त्यासाठी मतदारसंघात सतत दौरे करून सर्वांच्या सुख दुःखात अडीअडचणीत त्या सहभागी होत असल्याचे दिसून येते. मतदारसंघातील विद्यार्थी, तरुण, वृद्ध,अपंग निराधार, अंगणवाडी सेविका, शेतकरी, शेतमजूर,नोकरवर्ग आदिवासी असो प्रत्येकाच्या समस्यांना, सार्वजनिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील या असल्याचे दिसते त्यासाठी पाठपुरावा, आंदोलन, मोर्चे काढण्याची त्यांची सदैव तयारी असते मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील 182 गाव खेडे वस्त्यांवर काढलेली राष्ट्रवादी जनसंवाद यात्रा राज्यभरात लक्षवेधी ठरली या यात्रेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या सार्वजनिक समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केला तसेच पक्षाची संघटन बांधणी करून पक्षाच्या अठरा हजार सभासदांची नोंदणी केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षफुटी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांना महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पद दिले या पदाला न्याय देऊन पक्ष संघटन वाढविण्यासाठी त्या प्रयत्नशील असल्याचे दिसते त्यासाठी त्यांनी विदर्भ, उत्तर व पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागाचे दौरे करून पक्ष संघटनेचे मेळावे नियुक्त्या करून पक्ष संघटन वाढीस चालना दिली.
एकनाथराव खडसे यांनी भाजप मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुद्धा रोहिणी खडसे यांनी शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वर्धा, नागपूर, रामटेक, शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा करून उमेदवारांचा प्रचार केला.
बारामती लोकसभा मतदारसंघात
सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात असलेल्या हाय व्होल्टेज मुकाबल्यात सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ खडकवासला विधानसभा क्षेत्रात कॉर्नर सभा प्रचार फेरी काढून मतदारांशी संपर्क साधत सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला. रावेर लोकसभा मतदारसंघात आपल्या वहिनी रक्षा खडसे यांच्या विरोधात पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारात आणि रणनीती आखण्यात रोहिणी खडसे आघाडीवर आहेत. जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी खडसे यांच्या नियोजनातच मुक्ताईनगर येथे शरद पवार यांची भव्य सभा पार पडली या सभेतच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रोहिणी खडसे यांची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तर्फे परत एकदा उमेदवारी जाहीर केली. रोहिणी खडसे या घेत असलेली मेहनत त्यांचा जनसंपर्क व पक्षाच्या पाठबळाच्या जोरावर त्या मुक्ताईनगर मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा फडकवतील अशी मुक्ताईनगर मतदारसंघात जनमानसात चर्चा सुरू झाली आहे