
जळगाव मिरर | २४ मार्च २०२६
तालुक्यातील कुसुंबा येथील सुरेशदादा जैन नगर परिसरात जुन्या वादातून चार ते पाच जणांच्या टोळक्याने एका महिलेच्या घरात घुसून कोयत्यांच्या धाकावर तोडफोड करत दहशत माजवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुणाबाई करतार पवार (वय ५०) या कुसुंबा येथील सुरेशदादा जैन नगर परिसरात वास्तव्यास आहेत. दि. २१ मार्च रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून चार ते पाच जणांचे टोळके हातात कोयत्यांसारखी हत्यारे घेऊन त्यांच्या घराजवळ आले. त्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
घरात शिरल्यानंतर आरोपींनी मोठ्याने आरडाओरड करत “योगेश कुठे आहे, त्याला आम्ही सोडणार नाही” अशी धमकी दिली. तसेच “आम्हीच जळगावचे डॉन आहोत, आत्ताच जेलमधून बाहेर आलो आहोत; कोणी पुढे आले तर एक-एकाचा मुडदा पाडू” अशा शब्दांत परिसरात दहशत निर्माण केली.
यानंतर आरोपींनी कोयत्याच्या साहाय्याने घरातील भांडी व इतर साहित्याची तोडफोड करून नुकसान केले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर अरुणाबाई पवार यांनी दि. २२ मार्च रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून संबंधित चार ते पाच जणांच्या टोळक्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक राहूल तायडे करीत आहेत.




















