जळगाव मिरर | ९ डिसेंबर २०२५
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबरला जाहीर होणार असून त्यानंतर राज्यातील महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महायुतीकडून मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्व महापालिकांसाठी व्यापक रणनिती आखण्यास सुरुवात झाली आहे. तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरू असताना, मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे–राज ठाकरे युतीची चर्चा जोरात सुरू आहे.
महाविकास आघाडीने अलीकडेच “मतचोरी”च्या मुद्यावर सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही या मुद्द्यावरून भाजप-शिंदे सरकारवर कडाडून टीका करत भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे मनसेची संभाव्य दिशा महाविकास आघाडीकडे झुकत असल्याची चर्चेला उधाण आले होते.
या पार्श्वभूमीवर, एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल केलेले विधान मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहे. “राज ठाकरे यांना आता चिंतन करण्याची गरज आहे. उद्धवजी असोत किंवा महाविकास आघाडी—यापैकी कुणाचेही त्यांच्यावर प्रेम नाही; त्या वेळची राजकीय आवश्यकता म्हणून त्यांचा वापर केला जातो,” असा थेट आरोप फडणवीस यांनी केला.
फडणवीस पुढे म्हणाले, “राज यांच्याशी आमचे वैयक्तिक संबंध आहेत; राजकीय संबंध वेगळे असतात. ते मला टीका करतात, मीही करतो. पण राजकीय पातळीवर बोलायचे तर आमच्याकडे (महायुतीत) त्यांच्यासाठी जागा नाही. महाराष्ट्रातील राजकीय स्पेस आम्ही तिघांनी मिळून व्यापली आहे. त्यामुळे आमच्याकडे फारसा स्कोप नाही. त्यांना जिथे पक्षाचा फायदा दिसेल तिथेच ते जाणार, म्हणूनच ते तिकडे चालले असावेत.”
मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे कोणती भूमिका घेतात, ते महापालिका निवडणुकीत कुणाच्या बाजूने उभे राहतात, याकडे आता राज्याचे राजकीय लक्ष लागले आहे. महापालिका रणसंग्रामाच्या तोंडावर फडणवीसांच्या वक्तव्यामुळे राजकीय समीकरणे अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.





















