जळगाव मिरर | २४ जून २०२४
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची आढावा बैठक पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खा सुप्रिया ताई सुळे, प्रदेश अध्यक्ष आ. जयंतराव पाटिल, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी ताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे संपन्न झाली.
बैठकीच्या प्रारंभी खा.सुप्रियाताई सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात भरघोस मताधिक्याने विजय झाला त्याबद्दल त्यांचा महिला आघाडीच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कार्याध्यक्षा खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांनी महिला आघाडीच्या कार्याचा आढावा घेतला. प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी महिला आघाडीच्या कार्याचा आणि संघटनेचा लेखाजोखा सादर केला. तसेच आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्याचा मानस व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीत महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्या भगिनींनी प्रचारात सक्रिय सहभाग घेऊन घरोघरी चुलीपर्यंत जाऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला. आगामी विधानसभा निवडणुकीतसुद्धा महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ता भगिनी प्रचारात सक्रिय सहभाग घेऊन, पक्षाची ध्येय धोरणे, कार्य, शरद पवार यांचे विचार, कार्य तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवतील, असा विश्वास खा सुप्रियाताई सुळे, आ जयंतराव पाटील यांना रोहिणी खडसे यांनी दिला. त्याला उपस्थित सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी हात उंचावून संमती दिली.
पुढे बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, महिला या रणरागिणी असतात हाती घेतलेले कार्य त्या पूर्ण करतात. आपण बघितले सुप्रियाताई सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवत असताना त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. समोरच्या पक्षाने साम – दाम – दंड – भेद निती वापरली पण सुप्रियाताई सुळे यांनी या प्रकाराने विचलित न होता त्यांनी शांततेने आपला लढा सुरू ठेवला. मतदारसंघात शेवटच्या घटकापर्यंत असणारा त्यांचा दांडगा जनसंपर्क व केलेल्या विकास कामांच्या जोरावर त्या भरघोस मताधिक्याने विजयी झाल्या.
आगामी विधानसभा निवडणुकीतसुद्धा सत्ताधारी त्यांचे अपयश लपवण्यासाठी असाच साम – दाम – दंड – भेद नीतीचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतील. पण आपल्याला सावधानतेने निडरपणे जनतेत जाऊन आपल्या पक्षाला यश मिळवून द्यायचे आहे. त्यासाठी सर्व महिला पदाधिकारी मेहनत घेतील याची खात्री असल्याचा रोहिणी खडसे यांनी विश्वास व्यक्त केला.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या भगिनींनी प्रचारात हिरीरीने सहभाग घेऊन उत्कृष्ट कार्य केले त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. आगामी काळातसुद्धा महिलांनी सक्षमपणे पक्षाचा प्रचार करून आपले पक्ष संघटन मजबूत करावे. महिलांसमोर असलेले महागाई , महिलांवर वाढलेले अत्याचार या प्रश्नांना वाचा फोडून, आश्वासने देऊन हे प्रश्न सोडविण्यासाठी निष्क्रिय ठरलेल्या सत्ताधारी पक्षाचे अपयश जनतेसमोर मांडावे. तसेच आगामी काळात असणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बुथ पातळीपर्यंत पक्ष पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून प्रदेश पातळीवरून देण्यात आलेले आंदोलन, विविध उपक्रम राबवून कायम जनतेच्या, मतदारांच्या संपर्कात राहावे.
यावेळी मार्गदर्शन करताना खा सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीत पक्षाला, महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. या यशात महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचासुद्धा सक्रिय सहभाग आहे, त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. आगामी काळात विधानसभा निवडणुका आहेत त्यादृष्टीने आपल्याला जोमाने कामाला लागावे लागेल. कारण महिला या घरातील लोकांचे मत परिवर्तन करण्यात मोलाची भूमिका पार पाडतात म्हणून महिला भगिनी पर्यंत जाऊन सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे वाढलेली महागाई, महिलांवरील अत्याचार व इतर प्रश्न मांडून त्यामुळे माता भगिनींना होत असलेला त्रास निदर्शनास आणून द्या. शरद पवार साहेबांनी महिलांना दिलेले आरक्षण, वडिलांच्या संपत्तीत दिलेला वाटा व महिलांच्या हिताचे घेतलेले इतर निर्णय व आपल्या पक्षाची विचारसरणी माता भगिनींपर्यंत पोहचवा, असे खा सुप्रियाताई सुळे यांनी उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी आशाताई भिसे, कविताताई म्हेत्रे, अर्चनाताई घारे, भारतीताई शेवाळे, मृणालिनी वाणी आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या